करोना अ‍ॅन्टीजेन कीटचा संगमनेरात काळाबाजार

वापरलेल्या अ‍ॅन्टीजेन कीट रस्त्यावर फेकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
करोना अ‍ॅन्टीजेन कीटचा संगमनेरात काळाबाजार

संगमनेर| Sangmner| गणेश भोर

संपूर्ण जग करोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. या महामारीतून बाहेर पडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना

करोना रुग्णांसाठी वापरण्यात येणार्‍या वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट भस्मीकरण केंद्रात होते. मात्र संगमनेरात करोना चाचणीसाठी वापरण्यात येणारी अ‍ॅन्टीजेन चाचणी कीट नवीननगर रोडवरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या काही अंतरावर रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजाराची चर्चा सर्वत्र होत असतानाच संगमनेरात अ‍ॅन्टीजेन कीटचा काळाबाजार झाला का? याची चर्चा आरोग्य क्षेत्रात सुरू झाल्याने महसूल खातेही खडबडून जागे झाले आहे.

करोना महामारीने सर्वांनाच विळखा घालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकजन आज या महामारीपासून बचाव कसा होईल याचा प्रयत्न करत आहे. करोनावर उपाय योजना राबविण्याचा शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. अनेक प्रयोग करण्यात येत आहे. मात्र यश काही मिळत नाही. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतांना करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लस निर्माण करण्याचा शिवधनुष्य संशोधकांनी उचलले.

करोना झाला याची माहिती कशी समजेल यासाठी करोना अ‍ॅन्टीजेन कीट निर्माण झाली. या कीटच्या माध्यमातून करोना झालेला व्यक्ती निश्चित करण्यात येत आहे. या कीटला इतके महत्व आले की, सुरुवातील खासगी स्तरावर उपलब्ध होत असलेली कीट नंतर शासन स्तरावर उपलब्ध होवू लागली. ही कीट नंतर शासनामार्फतच पुरविण्यात येईल असे ठरले. त्यानुसार संगमनेर तालुक्यात 14 मेडीकल व 5 लॅब यांना निश्चित करण्यात आले. त्यांच्यामार्फतच ही कीट उपलब्ध होत होती.

आता ही कीट सर्वसामान्य व्यक्तीला उपलब्ध होवू शकत नाही, कारण ती आता शासन जमा झाली आहे. शासनास्तरावरील सूचनेनुसारच ती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता खासगी मेडीकल ही कीट विक्री करु शकत नाही. त्यामुळे शासनस्तरावर ज्या आरोग्य केंद्रावर ही कीट उपलब्ध असेल त्या ठिकाणी व्यक्तीला जावून आपली करोना टेस्ट करावी लागत आहे. मात्र हीच करोना कीट खासगी स्तरावर असतांना काही बड्या हॉस्पिटलने मोठ्या प्रमाणावर स्टॉक करुन ठेवला.

आता हीच कीट पाच हजार रुपयांपर्यंत विक्री होवू लागली. आणि ही हीच कीट वापरल्यानंतर रस्त्यावर आढळून आल्याने करोनाचे गांभीर्य कुणाला आणि किती आहे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. करोना अ‍ॅन्टीजेन कीट रस्त्यावर आढळून आल्याने संगमनेरात वैद्यकीय सेवेचा किती बोजबारा उडाला आहे याचे हे उदाहरण देता येईल. अनेक बड्या हॉस्पिटलमधून केवळ करोनाच्या नावाखाली धंदा सुरु झाल्याचेही निर्दशनास आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी पथकांची नियुक्ती केली आहे.

करोना अ‍ॅन्टीजेन चाचणी कीट रस्त्यावर आढळून आल्याने संगमनेरातील काही होलसेल मेडीकल मालकांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, जेव्हा ही कीट आली तेव्हा मेडीसीन विक्रेत्यांकडे आली होती. नंतर ती शासनाने त्यांच्या आधीन केली. तरीपण ती कुठल्याही मेडीकलमध्ये सहजा उपलब्ध होणार नाही. कारण ही अ‍ॅन्टीजेन कीट काही प्रमाणात थेट हॉस्टिपलमार्फत चालविणारे मेडीकल यांनाच येत होती. आता ती येत नाही. शासनाने तिच्यावर निर्बंध आणले आहे. आता ती शासनास्तरावर विक्री होत आहे.

अ‍ॅन्टीजेन कीट बड्या हॉस्पिटलसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली. अनेक डॉक्टरांनी लाखो रुपये या कीटच्या माध्यमातून कमविले. मात्र या कीटची विल्हेवाट लावण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. राज्यात 63 हजार 642 आरोग्यसेवा आस्थापना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यापैकी 29 केंद्र भस्मीकरण व उर्वरित केंद्र ही जमिनीत खोल वर पुरणे या पद्धतीने कार्यरत आहेत.

वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा कार्यरत असतांना खासगी हॉस्पिटलकडून त्या नियमांची पायमल्ली होतांना दिसत आहे. हे खासगी हॉस्पिटल एक प्रकारे करोनाला निमंत्रणच देत आहे. संगमनेरात अशा वर्दळीच्या ठिकाणी वापरलेली अ‍ॅन्टीजेन कीट आढळून आल्याने करोनाला पोषकच वातावरण निर्माण होणार आहे. या खासगी हॉस्पीटलचालकांवर कुठलेही निर्बंध राहिले नसल्याचेच यातून दिसून येत आहे.

संगमनेरमध्ये करोना बाधीतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दहा हजाराच्यापुढे संख्या गेली असून मयतांनी शंभरी गाठली आहे. असे असतांना खासगी हॉस्पीटलकडून वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या नियमांची पायमल्ली होतांना प्रशासन गप्प का? असाही सवाल सर्वसामान्यांकडून होत आहे.

रॅपीड अ‍ॅन्टीजेन कीट जिल्ह्यात विकण्यास परवानगी नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोणत्याही मेडीकलमध्ये ही कीट ठेवत नाही, तिची विक्री केली जात नाही.

-चेतन कर्डिले, अध्यक्ष, मेडीकल असोसिएशन, नगर जिल्हा.

अ‍ॅन्टीजेन कीट ही शासनस्तरावर मिळत आहे. खासगी स्तरावर ती मिळत नाही. खासगी स्तरावर ती बंद केली आहे. सदर कीट वापरात आल्यानंतर तीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही आरोग्य विभाग, शासन स्तरावर आहे. आरोग्य विभागाने हॉस्पिटलला निर्बंध घालून दिले आहेत. अ‍ॅन्टीजेन कीट खासगी हॉस्पिटलमध्ये वापरात येत असेल आणि ती वापरल्यानंतर तिची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नियमानुसार त्यांच्यावर आहे. मात्र तसे झाले नसेल तर त्याबाबत चौकशी करून योग्य ती सूचना करून अंमलबजावणी न झाल्यास कारवाई केली जाईल.

-अमोल निकम, इन्सीडेंट कमांडर, तथा तहसीलदार, संगमनेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com