जन्मदात्या पित्याचा मुलांकडून निर्घुण खून

संगमनेर तालुक्यातील चिखलीतील घटना
जन्मदात्या पित्याचा मुलांकडून निर्घुण खून

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा या कारणावरुन दोघा मुलांमध्ये वाद झाला. या वादातूनच या दोघा मुलांनी बापाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील चिखली येथे शनिवार ते रविवारच्या सुमारास मध्यरात्री घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी रामदास दशरथ माळी (वय 25) व अमोल दशरथ माळी (वय 18) यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथील रहिवाशी असलेले दशरथ सुखदेव माळी यांचे कुटुंब हे चिखली येथील विटभट्टीवर कामाला आहे. शनिवार रात्रीच्या सुमारास दशरथ सुखदेव माळी व त्यांची मुले रामदास दशरथ माळी व अमोल दशरथ माळी हे घरीच होते. जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा यावरुन रामदास व अमोल या दोघांमध्ये वाद झाला.

या वादातूनच दोघांनी मिळून मध्यरात्रीच्या सुमारास बाप दशरथ सुखदेव माळी यांचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयीतांना ताब्यात घेतले. सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासावरुन पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. वाय. टोपले यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी रामदास माळी व अमोल माळी या दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 252/2021 भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com