भोजापूर
भोजापूर
सार्वमत

भोजापूर धरण 80 टक्के भरले

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी बर्‍यापैकी संजीवनी ठरलेले भोजापूर धरण सुमारे 80 टक्के भरलेले आहे. आजमितीस या धरणांमध्ये सुमारे 210 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. धरणाची एकूण साठवणक्षमता 483 द.ल. घ.फूट आहे.

सद्यस्थितीमध्ये भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणाच्या वरील बाजूस म्हाळुंगी नदी वरील असलेले सर्व बंधारे भरून म्हाळुंगी नदी वाहत असल्यामुळे हे धरण उद्या किंवा परवा पर्यंत शंभर 100 टक्के भरून ओव्हर फ्लो होऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.

भोजापूर धरणाचे एकूण लाभक्षेत्र मुळ मंजूर 2905 हेक्टर व कालवा नुतनीकरणानंतरचे सुमारे 5 हजार हेक्टर इतके असून सिन्नर तालुक्यातील 16 गावांना व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील 5 गावातील लाभक्षेत्रास या धरणाचा फायदा होतो. तसेच या धरणांमधून सिन्नर व संगमनेर तालुक्यातील अंदाजे 20 ते 22 गावांना पाणी पुरवठा योजनांद्वारे व प्रवाही पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जातो.

संगमनेर तालुक्यातील कायम स्वरुपी दुष्काळी परिस्थिती असलेल्या निमोण- तळेगाव परिसरातील कोणत्याही धरणाच्या लाभक्षेत्रात नसणार्‍या सुमारे 15 गावांमधील शेततळे, दगडी व काँक्रीटचे बंधारे, ल.पा.तलाव भरण्यासाठी डाव्या कालव्याच्या अंतिम भागापासून सुमारे 16 किलोमीटर लांबीची व 40 क्युसेक्स विसर्ग वहन क्षमतेची भोजापूर पुरचारी 10 वर्षांपूर्वी खोदण्यात आलेली आहे, परंतु भोजापूर धरण बर्‍याच वेळा ओव्हर फ्लो होऊन देखील तळेगाव दिघे पर्यंत ओव्हर फ्लोचे पाणी पोहोचू शकलेले नाही. ही या भागातील शेतकर्‍यांची व जनतेची मोठी शोकांतिका आहे.

भोजापूर धरणांमधून जलसंपदा विभागाने वेळोवेळी उपसासिंचन योजना व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी सुमारे शंभर ते सव्वाशे दशलक्ष घनफूट इतके पाणी उपसा सिंचन योजनेच्या द्वारे उचलण्यास परवानगी दिलेली असल्याने भोजापूर धरणाच्या मूळ पाणीसाठ्यात सुमारे सव्वाशे दशलक्ष घनफूट पाण्याची घट/तुट निर्माण झालेली असून परिणामतः धरणाच्या लाभक्षेत्रातील प्रवाही सिंचनामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून शेतकर्‍यांना नेहमी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने करावी लागत आहेत.

या प्रकल्पाचे धरणस्थळी मंजूर वॉटर प्लॅनिंग नुसार अजूनही सुमारे दोनशे (200) दशलक्ष घनफूट इतका पाणी येवा (यील्ड) शिल्लक व उपलब्ध आहे. तद्नुषंगाने धरणाच्या सांडव्याची उंची सुमारे 1 ते 1.50 मीटरने वाढवून धरणाच्या बुडीत क्षेत्राचे मर्यादेत राहून अत्यल्प वाढीचा विचार न करता सिन्नर व संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना अजूनही किमान 100 दशलक्ष घनफूट इतके पाणी सिंचनासाठी सहज उपलब्ध होऊ शकते, याबाबत जलसंपदा विभागाकडे गेल्या 5 वर्षापासून याबाबत तांत्रिक दृष्ट्याअभ्यासपूर्ण उचित व शक्य असलेल्या मागणी बाबत जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त इंजि. हरिश्चंद्र चकोर हे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असून ह्यासाठी ते आग्रही आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com