संगमनेर : भोजापुर धरण ओव्हरफ्लो
सार्वमत

संगमनेर : भोजापुर धरण ओव्हरफ्लो

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील निमोण-तळेगाव या दुष्काळी भागासह सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरलेले भोजापुर धरण आज स्वातंत्र्य दिनी सायंकाळी 7 ते 7.30 दरम्यान पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याचे जलसंपदा विभाग, नाशिक यांचे कडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

भोजापूर धरणाची एकूण साठवणक्षमता 483 द.ल. घ.फूट इतका असून उपयुक्त पाणीसाठा 361 द.ल. घ.फूट इतका आहे. सद्यस्थितीमध्ये भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणाच्या वरील बाजूस म्हाळुंगी नदी वरील असलेले सर्व बंधारे भरून म्हाळुंगी नदी वाहत असल्यामुळे हे धरण आज सायंकाळी 100 टक्के भरून ओव्हर फ्लो झाले.

भोजापुर धरणाचे एकूण लाभक्षेत्र मुळ मंजूर 2905 हेक्टर व कालवा नुतनीकरणानंतरचे सुमारे पाच हजार हेक्टर इतके असून सिन्नर तालुक्यातील सोळा (16) गावांना व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील पाच (5) गावातील लाभक्षेत्रास या धरणाचा फायदा होतो.

तसेच या धरणांमधून सिन्नर व संगमनेर तालुक्यातील अंदाजे 20 ते 22 गावांना पाणी पुरवठा योजनांद्वारे व प्रवाही पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जातो, अशी माहिती हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com