संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहर व परिसरात भिशी व्यवसाय प्रचंड फोफावला आहे. शहरात तब्बल 100 हून अधिक भिशी सुरू असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

भिशी व्यवसायातील फसवणुकीमुळे अनेकांचे पैसे अडकले आहेत. यात शहरातील प्रतिष्ठीतांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्यांपर्यंत यात सहभागी आहेत. 5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे. यातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत.

साधारणत: दोन लाखांची भिशी असल्यास या भिशीमध्ये 20 जणांचा समावेश असतो. प्रत्येकाला 10 हजार रुपये हप्ता भरावा लागतो. पैसे जमा झाल्यानंतर लिलाव पध्दतीने नंबर काढला जातो. यामध्ये भिशी चालकांना दोन ते तीन टक्के रक्कम मिळते. काही भिशांमध्ये भिशीचालकाला एक नंबर फ्री असतो.

शहरात मोठ्या प्रमाणावर फोफवलेल्या या व्यवसायाकडे संबंधित खात्यांच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दोघा भिशी चालकांनी लाखो रुपये घेऊन पलायन केले होते. यामुळे अनेकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागला होता. भिशीच्या पैशांवरून मागील महिन्यात शहरात दोन गटांत हाणामारीही झाली होती. अनेक ठिकाणी दररोज वसुलीची पध्दत असल्याने भिशीचालक मालामाल झाले आहेत.

यामुळे काही भिशी चालकांची मग्रुरी वाढली आहे. या व्यवसायातून अनेकांनी जागा, घरे घेतली आहे. काही भिशी बंद पडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. शहरातील एका नगरसेवकाचीही भिशी आहे. या भिशीमध्ये अनेक मान्यवरांचे लाखो रुपये अडकले आहेत.लॉकडाऊनच्या काळापासून ही भिशी बंद असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. या भिशीतील गोंधळाची शहरात चांगलीच चर्चा झाली होती. मात्र नंतरच्या काळात सुरळीत झाल्याचे बोलले जाते.