संगमनेरातील कत्तलखाने बंद करा

बजरंग दलाचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन
संगमनेरातील कत्तलखाने बंद करा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहरातील कत्तलखान्यांबाबत शहर पोलिसांना इत्यंभूत माहिती देऊनही शहर व तालुक्यात बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याने

बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांची काल भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. शहरातील कत्तलखाने बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बजरंग दलाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, कुलदीप ठाकूर, विशाल वाघचौरे, वाल्मिक धात्रक अधिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन संगमनेर तालुक्यातील बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून संगमनेर शहर व तालुक्यात राजरोसपणे गोवंश हत्या चालू आहे.

दररोज साधारण 500 ते 600 गोवंशाची निर्दयीपणे हत्या केली जाते, त्या मांसाची बेकायदेशीर तस्करी होत आहे. याची माहिती संगमनेर शहर व तालुका पोलीस स्टेशनला कत्तलीची ठिकाणे, वेळ, आरोपींच्या नावांसाहित माहिती शहर व तालुका पोलीस प्रशासनास देऊनही ठोस कारवाई होत नाही. क्वचित कारवाई झाली तर त्यावेळी 5 टन गोमांस असले तर 500 ते 600 किलो दाखविले जाते.

आतापर्यंत आरोपींना जागेवर अटक होत नाही व छापा टाकल्यानंतर आरोपींना फरार दाखवतात व आरोपींना पाठीशी घातले जाते. गोवंश हत्या करणारे आरोपी व त्यांच्या वाहनांवर गुन्हे दाखल असूनही पुढेही दरवेळी तीच वाहने त्याच गुन्ह्यात वापरली जातात व आरोपी गुन्हे करतात. कत्तल होणारी ठिकाणे जमजम कॉलनी, भारत नगर, रेहमत नगर, कोल्हेवाडी रोड, फादरवाडी, कुरणरोड, मोगलपुरा ह्या ठिकाणी कत्तली होतात व येथे विक्रीही होते.

त्याठिकाणी बेकायदेशीर पत्र्याचे शेड(वाडे) बनवलेले आहे. याठिकाणी एका वेळेस 200 ते 300 गोवंश जनावरे ठेवता येईल असे शेड्स आहेत. त्यांना बेकायदेशीर 2 इंच नगरपालिकेचे अनधिकृत नळ कनेक्शन आहे, तसेच कत्तलीसाठी अत्याधुनिक कटिंग मशिनसाठी बेकायदेशीर वीज जोडणी केली आहे. त्यांचे ड्रेनेज सिस्टिममधून रक्ताचे पाट नदी पात्रात सोडले जातात. गोमांस हाडांचे वेस्टेज तुकडे नदीत फेकले जातात. त्यामुळे निबांळे, जोर्वे गावात दुर्गंधीसह, दूषित पाणी यामुळे आजार या परिसरात पसरले आहेत.

संगमनेर येथून गोमांस मुंबई, भिवंडी, संभाजीनगर, गुलबर्गा, हैदराबाद, बांगलादेश या ठिकाणी पाठवले जाते. लॉकडाऊन काळात ज्या वेळी सामान्य नागरिक, इतर माल वाहतुकीला परवानगी नसतांना गोवंश मांसाची तस्करी भाजीपाला आड होत होती. बर्‍याच वेळेस लॉकडाउन काळात माहिती देऊन गाडीचे नंबर देऊनही कारवाई केली जात नाही, त्याच गाड्यांवर बाहेर नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे कारवाई होते, त्यामुळे संगमनेर येथे मोठे अर्थकारण होत आहे.

संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. गोवंश व्यापार्‍यांचे काही पोलिसांशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्यामार्फत या सर्व घडामोडी अगदी बिनबोभाट सुरू असतात. कुरण येथे पोलीस पथकाला मारहाण झाल्यानंतर तेथील व्यापार्‍यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षकांना त्या अधिकार्‍याचा विरोधात सविस्तर निवेदन दिले होते, त्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यावर एकदा दृष्टीक्षेप टाकल्यास कुरण व संगमनेर संबंधावर प्रकाश टाकता येईल.

संगमनेर येथे गोरक्षण करतांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला दि. 19 जून 2017 रोजी झाला, त्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असे या निवेदनात म्हटले आहे.

संगमनेरचे कत्तलखाने बंदच राहणार

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहरात बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले. हे कत्तलखाने पुन्हा सुरू होऊ देणार नाही असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या निवेदनासंदर्भात शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, शहरातील कत्तलखाने रात्री-अपरात्री मी तपासत असतो. मी जोपर्यंत संगमनेरला आहे तोपर्यंत कत्तलखाने सुरू होऊ देणार नाही. आपण गुप्तचर यंत्रणा नेमलेली आहे ते मला माहिती देतातच. तरीही कत्तलखाने सुरू असल्याची माहिती एखादी संघटना, एखादा कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्त्यांंना असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे इतर कुणाकडे माहिती असेल तर त्यांनीही पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com