
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner
रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानक परिसरात उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपयाच्या देशी दारू सह रुग्णवाहिका जप्त केली आहे.
संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दारूची दुकाने बंद असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जात आहे. दोघा युवकांनी काल सकाळी दहा वाजता संगमनेर शहरातीलच एका दारूच्या दुकानातून ही दारू त्यांनी घेतली. तालुक्यातील शेडगाव येथे देशी दारू नेण्यात येणार होती.
सायरन वाजवत शहरातून रुग्णवाहिका घेऊन जात होते. संगमनेर बस स्थानक परिसरात बंदोबस्तासाठी उभ्या असणार्या पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा संशय आला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व काही पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवून आत मध्ये पाहणी केली या रुग्णवाहिकेत देशी दारूचे सात बॉक्स ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कैलास छबू नागरे (रा. शेडगाव), विजय खंडू फड (रा. मालदाड रोड, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेसह त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
याबाबत पोलीस शिपाई सचिन उगले यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता 188, 269, 65 (अ), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई, सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार फटांगरे करीत आहे.