संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सरपण देण्यात दुजाभाव

स्थानिकांना मोफत तर बाहेरच्यांना विकत
संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सरपण देण्यात दुजाभाव

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

येथील अमरधाम स्मशानभूमीत संगमनेर नगरपालिकेकडून अंत्यविधीसाठी मोफत सरपण दिले जात असले तरी यातही दुजाभाव होत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांना मोफत सरपण पुरवले जात असताना बाहेरील नागरिकांकडून मात्र सरपणासाठी पैसे आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

संगमनेर शहरालगत असणार्‍या प्रवरा नदीच्या किनारी नगरपालिकेने अमरधाम स्मशानभूमी उभारली आहे. शहराची लोकसंख्या मोठी असल्याने या अमरधाममध्ये अनेक अंत्यविधी होत असतात. याठिकाणी अंत्यविधीसाठी मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन संगमनेर नगरपालिकेने अमरधामचे स्वरूप बदलले आहे. या अमरधामचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांचा अंत्यविधी चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी नगरपालिका प्रशासनाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. अंत्यविधीसाठी किमान नऊ मन सरपण लागते. या सरपणासाठी नागरिकांची पूर्वी धावाधाव होत असायची. नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी यासाठी संगमनेर नगरपालिकेकडून मोफत सरपण पुरवावे अशी कल्पना नगरसेवक किशोर टोकसे यांनी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना सुचवली. ही कल्पना आवडल्याने सौ. तांबे यांनी त्वरीत मंजुरी दिली.

नगरपालिकेमध्ये मोफत सरपण पुरविण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. यानुसार नऊ मन सरपण नगरपालिकेकडून मोफत दिले जाते. यामुळे मृताच्या नातेवाईकांची गैरसोय दूर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या संकल्पनेला छेद दिला जात असल्याचे समोर आले आहे. करोना आजारामुळे मृतांची संख्या वाढत चालली आहे. बाहेरील तालुक्यातील मृतांचा अंत्यविधीही संगमनेरातील अमरधाम स्मशानभूमीमध्ये केला जात आहे. अंत्यविधीसाठी मोफत सरपण द्यावे, असा ठराव असतानाही सरपण पुरविणार्‍या ठेकेदाराकडून बाहेरील नागरिकांकडून नऊ मन सरपणासाठी तब्बल 2900 रुपये आकारले जात आहेत.

अंत्यविधीसाठीही दुजाभाव होत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नगरसेवकाने चिठ्ठी दिली तर बाहेरील नागरिकांनाही मोफत सरपण दिले जात आहे. सरपण पुरविणारा ठेकेदार खुलेआम मयतांच्या नातेवाईकांकडून पैसे आकारत आहे. या स्मशानभूमीत रजिस्टर ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये मयताची नोंद केली जाते बाहेरील नागरिकांची नोंद कशी केली जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मयताच्या अंत्यविधीमध्ये दुजाभाव केला जाऊ नये अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मृतदेह जाळण्यासाठी किमान दहा मन सरपण लागते मात्र केवळ नऊ मन सरपण पुरवले जाते यामुळे मृतदेह अनेकदा पूर्ण जळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पालिकेने यासाठी दहा मन सरपण पुरवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

संगमनेरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत सरपण द्यावे, अशी आपण सूचना केलेली आहे. शहरातील सर्व अंत्यविधींसाठी सरपण मोफत दिले जाते. बाहेरील तालुक्यातील नागरिकांचा अंत्यविधी संगमनेर झाला तरी त्यांनाही मोफत सरपण पुरवावे असे आपण सांगितले आहे. या सरपणाचे पैसे आमदार डॉ. सुधीर तांबे हे देणार आहेत. सरपणाचे जेवढे पैसे होतील तेवढे आपण देऊ असे आमदार डॉ. तांबे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरपण पुरविण्यात दुजाभाव केला जाणार नाही.

- सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा, संगमनेर

संगमनेर शहरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत सरपण पुरविले जातेे. बाहेरील तालुक्यातील नागरिकांना सरपंच मोफत द्यायचे की विकायचे हा अधिकार त्या ठेकेदाराचा आहे. एखाद्या नगरसेवकाने चिठ्ठी दिली तर सरपणाचे बिल त्या नगरसेवकाचे नाव जमा केले जाईल.

- सौ. मनीषा भळगट, सभापती सार्वजनिक आरोग्य समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com