संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनने येत्या 10 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले आहे. योगासनांच्या चार प्रकारात होणार्‍या या स्पर्धेतून खेळाडूंना राज्याच्या संघात जाण्याची संधीही मिळणार आहे. तीन गटात होत असलेल्या या स्पर्धेसाठी ऑनलाईन नावे नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी 8 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. नोंदणीशिवाय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुकास्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी करतांना दहा पैकी सहा सुवर्ण पदके पटकाविल्यानंतर मनोबल उंचावलेल्या राज्य योगासन संघटनेने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली असून त्या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभांचा शोध घेतला जात आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे.

मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात होणार्‍या या स्पर्धेत 9 ते 14 वयासाठी सब ज्युनिअर, 14 ते 18 वयासाठी ज्युनिअर व 18 वर्षांवरील वयासाठी सिनिअर अशा तीन गटात विभागणी केली गेली आहे. त्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. पारंपरिक एकल, कलात्मक एकल व दुहेरी आणि तालात्मक दुहेरी या योगासनांच्या चार प्रकारात ही स्पर्धा होत असून स्पर्धकांना एकापेक्षा अधिक प्रकारातही सहभाग घेता येईल.

स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी 8 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन नावेनोंदणी करणे आवश्यक आहे. ऐनवेळी अथवा मुदतीत नोंदणी न करणार्‍या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या स्पर्धेत विजयी होणार्‍या खेळाडूंचा संघ राज्य पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल, तर राज्य पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळणार आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी मालपाणी लॉन्स कॉलेजरोड, संगमनेर येथे होत असलेल्या या स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेश झोटींग व कुलदीप कागडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com