
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
सरकारने गौण खनिजांबाबत केलेल्या जाचक नियमांमुळे व लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम क्षेत्र ठप्प झाले असून कामगार व मजुरांची उपासमार झाली आहे. सरकारच्या विरोधात तालुक्यातील अभियंते, ठेकेदार, बांधकाम क्षेत्राशी निगडित व्यवसायातील कामगार व मजुरांचा विराट महाआक्रोश मोर्चा काल प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात मजूर व कामगारांनी महाएल्गार पुकारत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला.
या महाआक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शवत भ्रमणध्वनीद्वारे बोलताना काँग्रेस पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कॅनॉल साठी मोठा निधी मिळवून 2022 मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. मात्र सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांचे काम पूर्णपणे थांबले. याचबरोबर विविध विकास कामांनाही स्थगिती मिळाली.
राज्यातील अहमदनगर जिल्हा व विशेषता संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने गौण खनिजाच्या नावावर अन्यायकारक निर्बंध लावले आहेत यामुळे अनेक शासकीय विकास कामांसह, विविध रस्ते, सरकारी इमारती, घरकुल शाळा, खोल्या, अंगणवाडी अशी सरकारी कामे, याचबरोबर अनेक लोकांचे घरांची कामेही थांबली आहेत. महसूल विभागाने बेकायदेशीर रित्या अनेकांना दंड केले आहे. यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहे. एखाद्या विभागाचा विकासात बांधकाम विभागाचा मोठा वाटा असतो मात्र तोच थांबविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.
आपण महसूल मंत्री असताना कुणाचेही वाईट केले नाही. प्रत्येकाला मदतच केली. मात्र काही लोक आपले वाईट करायला निघालेले आहेत. संगमनेर तालुक्याचा झालेला विकास त्यांना पाहवत नाही, आपले चांगले चाललेले त्यांना सहन होत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.
जिल्ह्यात दहशतीचे राजकारण काहीजण करत आहेत हे दहशतीचे राजकारण आपल्या तालुक्यात त्यांना करायचे आहे. मात्र हा संगमनेर तालुका आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. दहशतीचे राजकारण आपण संघटित होऊन रोखणार आहोत, असेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध त्यांनी केला आहे.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, मार्स्कवादी कम्युनिष्ट पक्षाचे शांताराम वाळुंज यांनीही या महामोर्चाला पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी अरविंद पवार यांनी खोके सरकारचा तीव्र निषेध करत महसूल विभागाच्या जुलमी कारभाराविरुद्ध ताशेरे ओढले. तर किसन पानसरे, अजिंक्य वर्पे, सुभाष दिघे, व्यंकटेश देशमुख, सौ. दिपाली वर्पे, अनुपमा शिंदे, निलेश कडलग, योगेश पवार, प्रा. बाबा खरात, मोहनराव करंजकर, प्रदीप हासे, रामहरी कातोरे, के. के. थोरात, नरेंद्र पवार, बी. आर. चकोर यांनीही महसूल व सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.
यावेळी इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने झालेल्या या मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार लोमटे व तळेकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी निवेदन स्वीकारले.