प्राध्यापक कार्यकर्ता व जिल्हा पदाधिकार्‍यामध्ये राडा

प्राध्यापक कार्यकर्ता व जिल्हा पदाधिकार्‍यामध्ये राडा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एका कार्यक्रमानंतर जेवणाला गेलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये चर्चेतून वादाची ठिणगी पडली. यामध्ये प्राध्यापक असलेल्या एका कार्यकर्त्याने एका पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फोकून मारली. पदाधिकारी जखमी झाल्याने पदाधिकार्‍याच्या समर्थकांनी प्राध्यापक असलेल्या कार्यकर्त्याला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात घडली. या घटनेने एका पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. तर मारहाण झालेल्या पदाधिकार्‍याच्या समर्थकांनी संगमनेरात येवून रात्री उशीरा प्राध्यापक कार्यकर्त्याच्या घरासमोर जावून राडा केला. या घटनेने संगमनेरात एका पक्षाच्या दोन गटातील संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राध्यापक कार्यकर्ता व जिल्हा पदाधिकार्‍यामध्ये राडा
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

तळेगाव दिघे येथे काल झालेल्या एका कार्यक्रमासाठी काही प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी संगमनेरातून गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते वेगवेगळ्या गटाने वेगवेगळ्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते. त्यादरम्यान एका गटासोबत दोन जिल्हा पदाधिकारी देखील उपस्थित होते. जेवणाआधी एका चर्चेतून प्राध्यापक कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्राध्यापक कार्यकर्त्याने जिल्हा पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडत हाणामारी झाली.

ही वार्ता जिल्हा पदाधिकार्‍याच्या समर्थकांना समजली. माहिती समजताच समर्थक मोठ्या संख्येने तळेगाव येथे गेले. तेथे त्यांनी प्राध्यापक कार्यकर्ता व त्याचे समर्थक यांची यथेच्छा धुलाई केली. तेथून हे सर्मथक संगमनेरात दाखल झाले. प्राध्यापक कार्यकर्त्याच्या घरावर चाल करुन गेले. मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने प्राध्यापक कार्यकर्त्याच्या घरासमोर राडा केला. यामध्ये दुचाकी वाहनाचे नुकसान झाले. वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याची खबर पोलिसांना लागली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान वेगवेगळ्या पक्षाच्या युवा पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा पदाधिकार्‍याला झालेल्या मारहाणीचा समर्थकांनी तीव्र निषेध नोंदविला. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com