संगमनेरात चोरी करणारी टोळी सिन्नरमध्ये जेरबंद

संगमनेरात चोरी करणारी टोळी सिन्नरमध्ये जेरबंद

संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

कारचे शोरुम फोडून सुमारे पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास करुन पसार झालेली टोळी सिन्नर पोलिसांच्या मदतीने संगमनेर

शहर पोलिसांनी जेरबंद केली. गेल्या 15-20 दिवसांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. अखेर काल पोलिसांनी सिन्नर येथे जावून या टोळीला जेरबंद केले.

शहरालगत असणार्‍या कारच्या शान शोरुममध्ये रात्रीच्या सुमारास शिरुन अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, शहर पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांना या चोरट्यांचा सुगावा लागला. चोरटे हे सिन्नर तालुक्यातील शिंवडे येथील असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार सिन्नर पोलिसांच्या मदतीने विजय सुदाम कातोरे (वय 20), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय 21), विजय सखाराम गिर्हे (वय 20) यांना संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली.

संगमनेर येथील शान कार शोरुममध्ये 1,80,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल लंपास झाला होता. अकोले हद्दीतील मोबाईल शॉपी फोडून 2 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचीही या चोरट्यांनी कबुली दिली. येथे चोरट्यांनी चोरलेले 7 मोबाईल, एक बजाज कंपनीची 220 सी.सी.ची मोटार सायकल हस्तगत केली आहे.

सदर चोरट्यांनी होन्डाई शोरुममध्ये देखील कॅश कांऊटरचे लॉक उचकाटुन त्यामधील रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले व सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस नाईक विजय खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, शरद पवार, सचिन उगले, सुभाष बोडखे, फुरकान शेख, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com