महिला पाण्यासाठी करतात डोंगरदर्‍यातून पायपीट !

पठार भागात पाणी टंचाईच्या झळा || टँकर सुरू करण्याची मागणी
महिला पाण्यासाठी करतात डोंगरदर्‍यातून पायपीट !

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याचा (Sangamner Taluka) पठार भाग म्हटला की दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ (Summer Drought) असे समीकरणच बनले आहे. येथील अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांना सध्या कडक उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा (Severe Water Scarcity) सामना करावा लागत आहे. कधी पाण्यासाठी पायपीट तर कधी डोंगरदर्‍यात असलेल्या झर्‍याचा आधार घेऊन तहान (Thirst) भागवावी लागत आहे. दरेवाडी येथील महिला तर कोसो अंतराची पायपीट करुन खोल विहिरीतून (Well) पाणी वाहून आणत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पठारभागाला (Plateau) दुष्काळाचे (Drought) चटके बसू लागले आहेत. भल्या सकाळीच दरेवाडी येथील बायाबापडे डोंगर उतरून खाली येतात आणि तेथे असलेल्या विहिरीतून पाणी (Well Water) ओढून पुन्हा डोक्यावर दोन-तीन हंडे घेवून पायपीट करतात. त्यातच पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारी करावी लागत असल्याने पाणी आणावे की कामाला जावे अशा दुहेरी संकटात येथील महिला सापडल्या आहेत. उन्हाची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तशा पाणी टंचाईच्या झळा (The scourge of water scarcity) बसू लागल्या आहेत.

दरम्यान, पठारभागात पाऊस जरी मोठ्या प्रमाणात झाला तरी पाण्याचे उद्भव अथवा जलाशये कमी आहेत. यामुळे दीर्घकाळ पाणी साठवून ठेवण्यावर मर्यादा पडतात. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यात होत असून, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे बायाबापड्यांना डोंगरदर्‍यातून धोकेदायक प्रवास करुन डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. त्यांच्या सोबत लहान व तरुण मुलेही सायकल व दुचाकीला ड्रम बांधून पिण्याचे पाणी आणण्यासाठी मदत करतात. हे सर्व करुन रोजंदारीच्या कामासाठी धावपळ करावी लागते. अशा परिस्थितीत शासनाने लवकरात लवकर आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी भागुबाई केदार यांच्यासह परिसरातील महिलांनी केली आहे.

पठारभागातील पोखरी बाळेश्वर अंतर्गत असलेल्या तळेवाडी, काकडवळण, काळेवाडी, सरळधाववाडी, उंबरबेंड, टाकसेवाडी आणि कर्जुले पठारमधील दोन वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. त्याचबरोबर नव्याने पिंपळगाव देपा गावांतर्गत गावठाणासह दोन वाड्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहे, अशी माहिती संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व टंचाई कक्षप्रमुख संजय अरगडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com