
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डाळिंब शेती करत असताना वारंवार होणार्या चुका टाळल्यास संगमनेर तालुका हा डाळिंब शेतीचे आगार होऊ शकत असल्याचे मत जैन इरिगेशनचे कृषीतज्ञ तुषार जाधव यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे जैन इरिगेशन, बिरोबा हार्डवेअर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी परिसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी आप्पासाहेब रणसिंग यांनी ठिबक सिंचनाची निवड व देखभाल, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा तसेच पाणी व खत व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आधुनिक पद्धतीने शेती करत असताना जैन पीव्हीसी व एचडीपीइचा वापर कशा पद्धतीने करता येईल याविषयी माहिती मुकेश भांगरे यांनी दिली. डाळिंब पिकाची लागवड करत असताना जमीन व टिशू कल्चर रोपांची निवड शेतकर्यांनी काळजीपूर्वक करायला हवी तसेच मर रोग व पाणी व्यवस्थापन करताना रोपांच्या दोन्ही बाजूला ड्रीप नळ्या टाकण्यामागील शास्त्र तुषार जाधव यांनी शेतकर्यांना समजून सांगितले.
मंडल कृषी अधिकारी मनीष पंढुरे यांनी कृषी विभागाच्या योजनेबद्दल माहिती दिली तसेच शेतकर्यांच्या शंकांचे समाधान केले. सुनील दिघे यांनी आभार व्यक्त केले.