ATM फोडून १ लाख ७२ हजार रुपये लंपास!

तळेगाव दिघे येथील घटना; गॅस कटरच्या सहाय्याने ATM फोडले
ATM फोडून १ लाख ७२ हजार रुपये लंपास!

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले.

शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे. रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने सदर एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून टाकली. सदर एटीएम मधून १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केली. विजय केशव थेटे ( रा. कोल्हार बुद्रुक ता. राहाता ) यांच्या अखत्यारीत हे एटीएम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर श्री. थेटे यांनी पोलिसांना माहिती दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक टी. आर पवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक टी. आर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनेचा पंचनामा केला असून एटीएम फोडीच्या घटनेचा संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने तपास सुरु केला. याप्रकरणी विजय केशव थेटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५२/२०२१ भादवि कलम ३८०, ४२७ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी. आर पवार अधिक तपास करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com