
तळेगाव दिघे | वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या चारीतील साचलेल्या पाण्यात बुडून एका ७ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.
मधुबाला शाम साळुंखे (मूळ रा. बेलापूर ता. श्रीरामपूर, हल्ली रा. निळवंडे ता. संगमनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी ५.३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावाच्या शिवारात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी चारीचे खोदकाम सुरू आहे. सदर खोदलेल्या चारीतील साचलेल्या पाण्यात बुडून मधुबाला शाम साळुंखे ( वय ७ वर्ष ) या बालिकेचा मृत्यू झाला.
सदर बालिकेस घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीस तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी नारायण जगन्नाथ पवार ( वय ६२ वर्ष, रा. निळवंडे ता. संगमनेर ) यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.