विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या, तिघांना अटक

विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या, तिघांना अटक

आश्वी (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे मयुरी पवन सारबंदे (वय २४) या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला वैतागून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी सासरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अशोक वर्पे यांनी आश्वी पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी मयुरीचा विवाह २०१७ मध्ये पवन सारबंदे यांच्याबरोबर झाला होता. पती पवन सारबंदे, भाया अरुण सारबंदे व जाव वैशाली उर्फ बाली सारबंदे हे जमीन व गायी खरेदीसाठी मुलीने माहेराहून ५० ते ६० हजार रुपये आणावेत यासाठी नेहमी शिवीगाळ करत होते. त्यामुळे पैसे आल्यानंतर देऊ असे आम्ही तिच्या सासरच्या मंडळीना सांगितले होते. २०१८ मध्ये नात भाजल्यामुळे मयुरीच्या चुकीमुळेचं भाजल्याचे सांगत तिला जास्त त्रास सुरू झाला होता.

२०२० च्या सुरवातीपासून किरकोळ कारणावरुन शिवीगळ तसेच मारहाण करुन पैसे आणण्यासाठी बळजबरी केली जात होती. त्यामुळे ५, १० हजार असे १ लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले आहेत. परंतु मुलीला त्रास व पैशाची मागणी सुरुच होती. ९ ऑगस्ट रोजी मयुरीने विहिरीत उडी मारल्यामुळे लोणी येथे उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती नवरा पवन याने दिली. त्यामुळे मी रुग्णालयात गेल्यानंतर मुलगी मयत झाल्याची माहिती मिळाली. पैशासाठी मयुरीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला, या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

अशोक वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १५४/२०२१ नुसार भारतीय कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा शोकाकूल व तणावपूर्ण वातावरणात मयत मयुरी हिच्यावर उंबरी बाळापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com