तब्बल सहा महिन्यांपासून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपद रिक्त

तब्बल सहा महिन्यांपासून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपद रिक्त

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

सहा महिने उलटली तरी देखील संगमनेरला उपविभागीय पोलीस अधिकारी मिळेना. अति संवेदनशील समजल्या जाणार्‍या संगमनेर उपविभागात संगमनेर शहर, तालुका, आश्वी, घारगाव, अकोले व राजूर ही सहा पोलीस ठाणे येतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून प्रभारीराज कारभार सुरू आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत असून, पुन्हा एकदा खमक्या अधिकार्‍याची प्रतीक्षा लागली आहे.

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची नोव्हेंबर 2022 मध्ये नागपूर येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे. तेव्हापासून तब्बल सहा महिने होत आले तरी हे पद रिक्त आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. स्वतंत्र अधिकारी नसल्याने या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कामकाजावर परिणाम झालेला दिसून येत आहे. अवैध धंदे, चोर्‍या, मारहाणीचे प्रकार व अत्याचाराचे गुन्हे वाढले असून कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचत आहे. याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद असे मोठे सण-उत्सवही येणार आहे. त्यातच सध्या शहरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ वाढविणारे मजकूर व्हायरल होत आहे. यामुळे वातावरण दूषित होत आहे.

या संपूर्ण परिस्थितीत पूर्णवेळ अधिकारी असणे आवश्यक आहे. परंतु गृह विभागाकडून अजूनही स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती झालेली नाही. विशेषतः यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर येथे शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये लव्ह-जिहाद तसेच बळजबरीने धर्मांतर करणे अशा घटना घडल्या तर संबंधित अधिकार्‍याचे निलंबन केले जाईल असा सज्जड दमही दिला आहे. परंतु त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍याची तात्काळ नेमणूक होणे तितकेच गरजेचे आहे.

दरम्यान संगमनेर शहर संगमनेर तालुका, घारगांव, आश्वी, या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जवळपास 100 च्या वरती पोलीस कर्मचारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून या कर्मचार्‍यांचे इथे काही मन रमायला तयार नाही जो तो आपल्याला चांगले पोलीस स्टेशन मिळावे त्यासाठी त्यांच्या युक्तीने प्रयत्न करत आहे.

तत्कालिन अधिकारी राहुल मदने यांनी संगमनेरचा पदभार घेतल्यानंतर दोन वर्षाच्या कार्यकाळात दारुबंदीच्या 26 कारवाया केल्या. तर अवैध कत्तलखान्यावरील 16 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केल्या होत्या. अवैध वाळूतस्करी, जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 16 गुन्हे दाखल केले होते. सात ठिकाणच्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच चोरी व घरफोडी घटनांतील तीन घटना उघडकीस आणल्या.

गांजा विक्री प्रकरणी 6 गुन्हे दाखल केले. सात खुनाच्या गुन्ह्यांचीही उकल करून आरोपींना अटक केली. दरोडा टाकणार्‍या टोळीचा पर्दाफाश करून तीन गुन्ह्यांची उकल केली. महिलांच्या अंगावरील दागिने चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळून नऊ गुन्हे उघडकीस आणले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खमक्या अधिकार्‍याची वर्णी लागावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com