संगमनेरातील एसटीपी प्लांटच्या जागेचा तिढा सुटेना

पालिका निवडणुकीत सत्ताधार्‍यांची डोकेदुखी वाढणार
संगमनेरातील एसटीपी प्लांटच्या जागेचा तिढा सुटेना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील जोर्वे नाका परिसरातील नियोजित मलनिःसारण प्रकल्पाची ( एस.टी. पी. प्लांट) जागा बदलण्यात यावी या मागणीसाठी एसटीपी प्लांट स्थलांतर कृती समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या पंधराव्या दिवसानंतरही या आंदोलनाची सत्ताधार्‍यांनी दखल घेतली नसल्याने शहरातील मुस्लिम बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास याचे पडसाद आगामी नगरपालिका निवडणुकीत दिसून येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान साखळी उपोषणाला पंधरा दिवस लोटले असले तरी प्रश्न अद्याप सुटला नसल्याने सत्ताधार्‍यांची डोकेदुखी वाढणार आहे.

संगमनेर नगरपालिका प्रशासनाकडून या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. संबंधितांकडून जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील मुस्लिम समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्लांटची जागा न बदलल्यास नगरपालिका निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा देण्यात येत आहे. संगमनेर मुस्लिम मतदारांची संख्या निर्णय असल्याने एसटीपी प्लांटचा विषय सत्ताधार्‍यांना अडचणीचा ठरू लागल्याची चिन्हे आहे.

या प्लांटची जागा न बदलल्यास संगमनेर नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढून नगरपालिका कार्यालयास टाळा ठोकू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. प्लांटची जागा बदलावी या मागणीसाठी रहेमतनगर, डाके मळा, डोंगरे मळा, एकतानगर, जोर्वेनाका, लखमीपुरा, नाईकवाडपुरा, उम्मतनगर, देवीगल्ली, मोगलपुरा भागातील नागरिक एकवटले आहे.

याशिवाय उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. एसटीपी प्लांटची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलावी या मागणीसाठी मुस्लिम समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे. नगरपालिका निवडणूक तोंडावर आल्याने सत्ताधारी हा प्रश्न कसा मार्गी लावतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कृती समितीचे नईम शेख, समीर शेख, इम्तियाज शेख, मुजामिल शेख, फिरोज पठाण, नजीर शेख, अब्दुल शेख, मुन्ना शेख, गौस शेख, बालेखान पठाण, लाला मुजीब खान आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com