रात्रीस खेळ चाले...संगमनेरात शेकडो जनावरांची कत्तल

रात्रीस खेळ चाले...संगमनेरात शेकडो जनावरांची कत्तल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गोवंश जातीच्या जनावरांची जीवघेणी कत्तल या जनावरांचे रक्ताचे थारोळे..संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यातील हे दररोजचे चित्र. जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही यामध्ये बदल होताना दिसत नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून जनावरांची कत्तल वाढली आहे. दररोज रात्री पाच वाहनांमधून गोमांसाची खुलेआम मुंबईला वाहतूक केली जात आहे. अनेकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असताना पोलिसांच्या मात्र लक्षात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहर हे गोमांस विक्रीचे राज्यातील प्रमुख केंद्र बनले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये शेकडो जनावरांची कत्तल केली जात आहे. राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र या कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही. शहरातील कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड, जमजम कॉलनी या परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. पोलिसांच्या थातूरमातूर कारवाईनंतर कत्तलखाने बंद असल्याचा दावा केला जातो प्रत्यक्षात मात्र हे कत्तलखाने सुरुच आहेत.

जनावरांचे कत्तल केलेले हजारो टन मांस भल्या पहाटे मुंबईकडे पाठवले जाते. पाच ते सहा मोठमोठ्या वाहनांमधून या गोमांंसाची वाहतूक केली जात आहे. या वाहनांमागे कसायांची फौज असते. पोलिसांची कोणतीही भीती न बाळगता ही वाहतूक खुलेआम सुरू आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला हे मागील आठवड्यात संगमनेरात आले होते. शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. असे असतानाही कत्तलखाने बंद होण्याऐवजी आणखी वेगात काम करताना दिसत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला स्थानिक पोलीस कुठलीही किंमत देत नसल्याचे यावरून दिसत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः रात्री अचानक संगमनेर येथे पाहणी केल्यास त्यांना कत्तलखान्यांचे भयान वास्तव दिसू शकेल.

शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती. प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. राज्यातील ही मोठी कारवाई मानली जात होती. या कारवाईमुळे कत्तलखान्यांचे वास्तव समोर आल्याने शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या संघटनांनी मोठे आंदोलन केल्यानंतर शहरातील पाच कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते. काही दिवसांच्या कालखंडानंतर हे कत्तलखाने पूर्ववत सुरू झाले आहेत.

कत्तलखान्याच्या माध्यमातून मोठे अर्थचक्र सुरू आहे. या व्यवसायात अनेकांचा सहभाग आहे. या बेकायदेशीर व्यवसायाला पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचाही आशीर्वाद आहे. कत्तलखाने बंद न झाल्यास पुन्हा एकदा हिंदूवादी संघटनांचे मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत.

पोलिसांची गस्त संशयास्पद

संगमनेर बसस्थानक ते घुलेवाडी या परिसरातच पोलीस रात्रीच्यावेळी गस्त घालतात. शहरातील ज्या भागात कत्तलखाने सुरू आहेत त्या भागात मात्र हे पोलीस फिरकताना दिसत नाही. यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. पोलीस या भागात फिरकत नसल्याने कत्तलखाना चालकाचे चांगलेच फावले आहे. पोलीस अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचारी कत्तलखाना चालकांवर कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा आहे. संगमनेरात दबंग अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com