संगमनेरात शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उघड

गद्दार हटाव, शिवसेना बचावचे फलक झळकले
संगमनेरात शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उघड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शिंदे गटात गेलेल्या गद्दारांवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये निलंबनाची कारवाई केली. उत्तर नगर जिल्हा व संगमनेरमध्ये कारवाई कधी? गद्दार हटाव - शिवसेना बचावच्या आशयाचे फलक संगमनेर शहरात झळकल्याने संगमनेर येथील शिवसेना अंतर्गत असलेली गटबाजी उघड झाली आहे. शहरातील दोन पदाधिकार्‍यांमध्ये गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरू असल्याने या वादाची जोरदार चर्चा होत आहे. या पदाधिकार्‍यांमधील वादाचा तिसर्‍याच व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संगमनेर शहरामध्ये काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रचंड फोफावली होती. माजी शहर प्रमुख रावसाहेब गुंजाळ, आप्पा केसकर यांच्या कारकिर्दीत संगमनेर शहरात शिवसेनेची चांगली वाढ झाली. आप्पा केसेकर यांच्यानंतर शहरप्रमुखपदाची जबाबदारी अमर कतारी यांच्यावर देण्यात आली. कतारी यांनी शिवसेना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले. शिवसेना वाढीसाठी संगमनेर शहरामध्ये नंतर दोन शहरप्रमुख नेमण्यात आले. उत्तर व दक्षिण असे दोन शहरप्रमुख नेमल्यास शिवसेनेची वाढ आणखी होईल, असे शिवसेनेला वाटत होते. मात्र तसे घडल्याचे दिसत नाही. यानंतर तत्कालीन शहरप्रमुख संजय फड यांना थांबविण्यात आले. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार यांचे चिरंजीव प्रसाद पवार यांना शहरात प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र या दोन पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे बोलले जात आहे.

मागील महिन्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये यातील एक पदाधिकारी अनुपस्थित होता. दोघांमध्ये समन्वय नसल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यातच पोलीस ठाण्यापासून जवळच अंतरावर शिवसेनेच्या एका गटाने मोठा फलक लावला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई केली. अशीच कारवाई संगमनेर येथील पदाधिकार्‍यांविरुद्ध करावी, अशी मागणी या फलकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे हा फलक शहरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

संगमनेर येथील शिंदे गटात कोण गेले? व कोण जाणार आहे? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या फलकामुळे संगमनेर शिवसेनेमध्ये अंतर्गत धूसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.

दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ !

अंतर्गत संगमनेर शहरामध्ये सुरू असलेल्या वादामुळे शहर शिवसेनेमध्ये सर्वच आलबेल आहे, असे दिसत नाही. नावाने चर्चा होत असलेल्या पदाधिकार्‍यांच्या वादामुळे पक्षश्रेष्ठी लवकरच लक्ष घालणार असल्याचे बोलले जात आहे. या वादामुळे दोघांचीही पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी एकच नवीन पदाधिकारी नेमला जाऊ शकतो. यामुळे या दोघांमधील वादाचा फायदा तिसर्‍याला होण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्याने शिवसेना नेते या वादात लवकरच तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com