संगमनेरात 25 वासरांसह बाराशे किलो गोवंश जनावरांचे मांस जप्त

संगमनेरात 25 वासरांसह बाराशे किलो गोवंश जनावरांचे मांस जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतानाही संगमनेरातील कत्तलखाने काही बंद होत नाहीत. मोठ्या प्रमाणावर कत्तलखान्यांतून जनावरांची कत्तल होऊन ते मांस बाहेरील जिल्ह्यात पाठविण्याचा प्रकार सुरुच असल्याचे उघडीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत 1200 किलो गोवंश जनावरांच्या मांसासह पिक जीप जप्त करण्यात आली तर दुसर्‍या कारवाईत 25 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.

बुधवारी एका पिकअप जीपमधून गोवंश जनावरांचे मांस जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना गुप्त खबर्‍यामार्फत मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस पथक कारबाईबाबत सूचीत केले. पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल आढाव यांनी तातडीने वडगावपान शिवार गाठले. पथक वडगावपान फाट्यावर थांबले. संगमनेर रोडने पांढर्‍या रंगाची पिकअप येताना पोलिसांना दिसली. सदर वाहन पोलिसांनी थांबविले.

तपासणी केली असता सदर वाहनात भुस्सा गोणी होत्या. त्याखाली गोवंश जनावरांचे मांस होते. सहाय्यक फौजदार आहेर यांनी पंचनामा केला. सदर पिक अप जीपमध्ये 2 लाख 40 हजारांचे 1200 किलो गोवंश जनावरांचे मांस, 1 लाख 50 हजारांची महिंद्रा पिक अप जीप क्रमांक एमएच 14 डी. एम. 8375 असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात मोसीन अन्वर कुरेशी (रा. भारतनगर), तौसिफ ताहीर कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5(क), 9(अ) प्रमाणे दाखल केला आहे. यातील आरोपी मोसीन अन्वर कुरेशी (रा. भारतनगर) यास पोलिसांनी अटक केली आहे तर तौसिफ कुरेशी फरार आहे.

तसेच त्याच दिवशी चार वाजता गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे या पोलीस पथकाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक सचिन उगले व होमगार्ड शुभम थोरात यांना सोबत घेत शहरातील मदिनानगर येथील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागील काटवानामध्ये छापा टाकला. या छाप्यात तंज्जमुल निसार कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) याने कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जातीचे 25 वासरे ही चारा पाणी न टाकता निदर्यतेने बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर जनावरांची पोलिसांनी सुटका करुन सदर जनावरे ही जीवदया गोशाळा संस्था सायखिंडी फाटा, संगमनेर येथे पाठविली.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात तंज्जमुल निसार कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंद करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 3,11 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 चे सुधारीत कलम 2015 चे कलम 5(अ), 1, 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com