संगमनेर (प्रतिनिधी) -

बलशाली भारत घडवायचा असेल तर बलशाली खेडं निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी व्हिजनरी सरपंच मिळाला पाहिजे. सुविधा आणि समृद्धी गावात आली तर

गाव खेडं राहणार नाही, याच उद्देशाने आंबीखालसा ग्रामपंचायतीची निवडणूक लढविलेल्या जालिंदर गागरे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर पदभार स्विकारण्यासाठी त्यांनी थेट हेलिकॉप्टरमधून एंट्री केली. सरपंचांची ही एंट्री अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली.

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे हा नूतन सरपंच व नूतन सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाचे थेट हेलीकॉप्टरने आगमन झाले. या सोहळ्यास सारा गाव लोटला होता. सनई चौघड्यांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, अबालवृद्धांची लेझीम, आख्ख्या गावातील महिला फेटे बांधून सज्ज झालेल्या आणि सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन.. असा नयनरम्य सोहळा रंगला. संगमनेर तालुक्यात. एखाद्या मंत्र्याला लाजवेल असा शपथविधी सरपंचाचा पार पडला आहे. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

आंबीखालसाचे तरुण उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचा संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाला. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे काल सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले.

बलशाली भारत जर बनवायचा असेल तर खर्या अर्थाने माझं खेडं बलशाली झाले पाहिजे. गाव बलशाली झाले पाहिजे, ज्याप्रमाणे देशाला व्हिजनरी पंतप्रधान तर राज्याला व्हिजनरी मुख्यमंत्री लाभले त्याच प्रमाणे गावाला देखील व्हिजनरी सरपंच मिळाला पाहिजे. तरच गावाचा कायापालट होईल, उद्योजक मंडळींनी गावाची सेवा केली पाहिजे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला...असा संदेश दिला होता याच संदेशाने आपण प्रेरीत झालो. आज शहर आणि गाव ही दरी कमी करायची असेल तर महात्मा गांधींनी दिलेल्या मंत्राचा जागर होवून अंमलात आणण्याची गरज आहे. सुविधा आणि समृद्धी गावात आली तर गाव खेडं राहणार नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून गाव विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तरुण व ग्रामस्थांना सोबत घेवून आदर्श गाव निर्माण करण्याचा विश्वास नूतन सरपंच जालिंदर गागरे यांनी बोलतांना व्यक्त केला.

यावेळी मंत्र्यांना दिली जाते अशी शपथ सरपंच जालिंदर गागरे आणि सदस्यांना देण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार शरद दादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले उपस्थित होते.