बोगस बिनशेतीच्या आधारे जमिनीची विक्री; 'एन ए' संशयाच्या भोवऱ्यात

बोगस बिनशेतीच्या आधारे जमिनीची विक्री; 'एन ए' संशयाच्या भोवऱ्यात

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

शहरातील नवीन नगर रोड परिसरातील ताजणे मळा येथील ४ एकर १७ गुंठे जमिनीच्या विक्री प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे. बोगस बिनशेतीच्या आधारे या जमिनीची खरेदी-विक्री झाल्याचे समोर आले आहे. सदर जमीन बिनशेती करताना या जमिनीवरील दर्गाहच गायब केल्याचा आरोप दर्गाहच्या मुख्य विश्वस्तांनी केल्याने या प्रकरणाची गुंतागुंत वाढत चालली आहे.

शहरातील नवीन नगररोड परिसरातील ताजणे मळा लगत ४ एकर १७ गुंठे जमीन गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही जागा अत्यंत मोक्याच्या भागात आहे. या जागेच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. ही जागा दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह शाह ऊर्फ बारामासी या दर्गाह साठी इनाम देण्यात आली होती. या जागेवर ७० वर्षांपासून पीर दर्गाह अस्तित्वात आहे. एका परिवाराने सदर जागेवर बेकायदेशिर हक्क दाखविला. सदर जागेचे भाव वाढल्याने सदर परिवाराने ही जागा बेकायदेशिररित्या विक्री केली. या जागेवर बांधलेल्या इमारती मध्ये अनेक प्रतिष्ठित राहतात. कोट्यवधी रुपये खर्च करून या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. जागा बिनशेती असल्याशिवाय जागा खरेदी करण्यास अनेक जण नाखूष असतात. यामुळे सदर जागा ताब्यात असणाऱ्याने ही जागा बिनशेती असल्याचे दाखविले. ही जागा सोडून दुसरी जागा शेती केलेली होती त्या जागेचा आधार घेऊन सदर जागा बिनशेती असल्याचे या या परिवाराने दाखवून ही जागा कोट्यवधी रुपयांना अनेक व्यक्तींना विक्री केली आहे.

या जागेवर १८५४ सालापासून दर्गाह अस्तित्वात आहे. त्याची नोंदही अनेक ठिकाणी आढळते. मात्र जागा बिनशेती करताना या परिवाराने या जागेतील दर्गाहस गायब करून टाकले. यातून सदर परिवाराने शासनाची फसवणूकच केली आहे. दर्गा च्या मुख्य विश्वस्तांनी या जागेबाबत पाठपुरावा सुरू ठेवल्याने जागा खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान या जागेची खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने व दर्गाहाचे मुख्य विश्वस्त शेख अब्दुल गफ्फार अब्दुल लतीफ यांनी जागेचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या विश्वस्तांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्याबरोबरच न्यायालयात धाव घेतल्याने जागा विकणाऱ्या परिवाराची चलबिचल सुरू झाली आहे. या परिवारातील एका वरिष्ठ सदस्याने या जागेतील मालमत्ता धारकांकडून न्यायालयीन लढाईसाठी वर्गणी मागण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये मागणी त्याने मालमत्ता धारकांकडे केली. यामुळे हे मालमत्ताधारक चांगलेच संतापले आहे. "आम्ही जागेच्या खरेदीसाठी लाखो रुपये मोजले आहेत, आता आमच्या कडून पैसे का मागतात' असे खडे बोल मालमत्ता धारकाने सदर व्यक्तीला सुनावले आहे.

यामुळे मालमत्ताधारक व जागा विकणाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर सदर व्यक्तीने यामुळे तेथून काढता पाय घेतला. ही घटना इतर मालमत्ता धारकांच्या कानावर गेल्याने त्यांनी सदर परिवाराच्या सदस्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेने मालमत्ताधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जमिनीचे आता काय होणार? अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.