संगमनेरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांच्या जाळ्यात

संगमनेरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांच्या जाळ्यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेली पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली आहे. चार दरोडेखोरांना अटक करण्यात आले असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा परिसरात घडली. दरोडेखोरांकडून वेगवेगळी हत्यारे आणि साहित्यासह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल या आपले सहकारी पोलीस कर्मचारी अजय आठरे, अण्णासाहेब दातीर, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव, सुभाष बोडखे यांच्यासह पुणे नाशिक महामार्गावर गस्त घालीत असताना स्विफ्ट कार त्यांच्या निदर्शनास आली. कारचा वेग आणि क्रमांक नसल्यावरुन पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला, पोलिसांनी या कारचा पाठलाग करून अडवले. पोलीस आपल्याला पकडणार याचा अंदाज आल्याने कार मधील एक दरोडेखोर जवळच्या शेतात पळून गेला.

पोलिसांनी इतर चौघांना अटक केली. या दरोडेखोरांना कारच्या खाली उतरवून त्यांच्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. गाडीच्या पाठीमागील बाजूच्या शीटवर सुमारे 20 फूट लांबीची नायलॉन दोरी, एका बाजूला तीक्ष्ण टोक आणि दुसर्‍या बाजूला वर्तुळाकार वाकवलेले गज, करवत, कटावणी अशी दरोडा घालण्यासाठी विविध हत्यारे आणि अवजार आढळून आले. पकडण्यात आलेले दरोडेखोरच असल्याची पोलिसांना खात्री झाली.

दरोडेखोरांचे स्वीफ्ट वाहन (एम. एच. 02 सी. डी. 8148) व दरोडेखोरांच्या टोळीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी महेंद्र लक्ष्मण मधे (वय 24, सध्या रा. अभंगवस्ती, नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव (वय 26, सध्या रा. लोहगाव एअरपोर्ट शेजारी, लोहगाव, पुणे), प्रविण चंद्रकांत जाधव (वय 24, रा. शिरोली, ता. जुन्नर, जि. पुणे), रोहन रामदास गिर्‍हे (वय 20, हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 188/2023 भारतीय दंड संहिता कलम 399, 402, 4, 25 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com