संगमनेररोडवरील अतिक्रमण तीन दिवसांत काढा

पालिकेने 165 व्यावसायिकांना दिल्या नोटिसा
संगमनेररोडवरील अतिक्रमण तीन दिवसांत काढा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन बळी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांत आपले अतिक्रमण काढा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशाप्रकारे नगरपालिकेने संगमनेर रोडवरील 165 व्यावसायिकांना नोटिसा काढल्या आहेत.

श्रीरामपूर शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणामुळे व्यावसायिकांनी 6 ते 7 फूट दुकाने पुढे वाढविली असल्यामुळे निम्मा रस्ता अतिक्रमणातच जात असल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या अपघातांमध्ये बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन अतिक्रमणे काढावीत, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांसह काही नागरिकांनी वैयक्तीक केली होती. त्या पार्श्वभूमीवर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आपण वापर करत असलेल्या किंवा आपण सुरू केलेल्या जमिनीचा वापर मुख्य रस्त्यांच्या जागेत असून सदर अतिक्रमण तीन दिवसांत काढण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमचे कलम 1966 चे कलम 52, 53, 54, 55, 56 व 57 आणि महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965चे कलम 189, 190 अन्वये श्रीरामपूर नगरपालिकेने 165 कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील एका 23 वर्षीय फोटोग्राफर तरुणाचा दुधाच्या टँकरखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातास अतिक्रमण जबाबदार असल्यामुळे पालिकेने ही बाब गांभीर्याने घेतली असून या परिसरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने नेहमी अपघातास निमंत्रण ठरणारे श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com