
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
बेकायदेशीर रीत्या वाळूची वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या रिक्षा महसूल खात्याने भंगार मध्ये विकल्या.या रिक्षाचा पुन्हा गैरवापर होऊ नये हा उद्देश प्रशासनाचा असतानाही चक्क भंगार मध्ये विकल्या गेलेल्या अनेक रिक्षांमधून पुन्हा वाळूची आणि प्रवाशांची वाहतूक होत असल्याने या रिक्षांच्या लिलावाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
संगमनेर शहर व परिसरात शेकडो रिक्षा बेकायदेशीरपणे धावत आहे. अनेक रिक्षांना कागदपत्र नसतानाही या रिक्षा मधून खुलेआम प्रवाशांची वाहतूक होत आहे. यातील काही रिक्षाचा वापर वाळू वाहतुकीसाठी ही केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातून अल्प दरात या रिक्षा खरेदी केल्या जातात. या रिक्षाचा वापर वाळू तस्करीसाठी करण्यात येतो महसूल प्रशासनाने या रिक्षांवर कारवाई केली तरी दंड न भरताच रिक्षा मालक या रिक्षा सोडून देतात रिक्षांच्या किमतीपेक्षा अनेक पटीने दंड आकारण्यात येतो यामुळे रिक्षा मालक या रिक्षा सोडून देतात. महसूल खात्याचा अधिकार्यांनी अनेक कारवाई करून या रिक्षा जप्त केलेले आहेत.
संगमनेर येथील तहसीलदारांनी जप्त केलेल्या बेकायदेशीर 26 रिक्षाचा 2 लाख 33 हजार 500 रुपयांमध्ये लिलाव केला होता. जप्त करण्यात आलेल्या रिक्षा नष्टा करून भंगारामध्ये विकल्या जातात. या रिक्षाचा पुन्हा वापर केला जाऊ नये असा हेतू यामागे असतो प्रत्यक्षात मात्र या रिक्षा नष्ट न करता त्यांचा लिलाव करण्यात आला होता. एका दलालाने दुसर्या व्यक्तींच्या नावावर लिलाव घेऊन या रिक्षा घेतल्या होत्या काही महिन्यानंतर या रिक्षा पुन्हा संगमनेर शहरात दिसू लागल्या काही रिक्षांमधून वाळूची वाहतूक केली जात आहे.
भंगार मध्ये विकले गेलेल्या रिक्षा पूर्ण पुन्हा रस्त्यावर धावत असल्याने महसूल प्रशासनाने या रिक्षाचा लिलाव कशा पद्धतीने केला ,या रिक्षा नष्ट का केल्या नाही ? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. संगमनेर नव्याने बदलून आलेले तहसीलदार यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.
वाळू तस्कराकडून रिक्षाची खरेदी ?
प्रवरा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करणार्या रिक्षा तत्कालीन तहसीलदारांनी जप्त केल्या होत्या. या रिक्षा नष्ट करून भंगार मध्ये त्यांचा लिलाव होणे गरजेचे असते प्रत्यक्षात मात्र असे झाल्याचे दिसत नाही.एका वाळू तस्कराने 10 हजार रुपये किमतीने काही रिक्षा विक्री केल्याची चर्चा आहे.अशा पद्धतीने रिक्षा विकल्या जात नाही असे असतानाही या वाळू तस्करांनी रिक्षांची खरेदी कोणत्या आधारे केली तत्कालीन तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष का केले असे सवाल आता विचारले जाऊ लागले आहेत