
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहरालगतच्या प्रवरा नदीपात्रातून होणार्या वाळू उपशाबाबत काल महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेत रिक्षाच्या साह्याने होणारी वाळू वाहतूक थांबवून या रिक्षामधील गोण्या एकत्र करून पेटवून देऊन नष्ट करण्यात आल्या.
संगमनेर शहराच्या प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउपसा केला जात आहे. काही वाळूतस्कर विनापरवाना वाळूचा उपसा करून ही वाळू रिक्षाच्या साह्याने वाहतूक करीत आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळूची वाहतूक होत असताना महसूल प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.
काल सकाळी नदीपात्रामधून तीन रिक्षांच्या साह्याने वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल खात्याच्या अधिकार्यांना मिळाली. तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तळेकर, कामगार तलाठी पोमल तोरणे यांच्या मार्गदर्शक खालील पथकाने नदीपात्रा लगतच्या गंगामाई घाटाजवळ जाऊन पाहणी केली. याठिकाणी रिक्षा मधून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्व रिक्षांना थांबवून रिक्षांमधील वाळूच्या गोण्या एका ठिकाणी जमा केल्या.
जमा केलेल्या वाळूच्या गोण्या पेटवून देऊन नष्ट करण्यात आल्या. महसूल पथकाने कारवाई सुरू करतात इतर रिक्षा चालक पळून गेले. या पथकाने तीन रिक्षा जप्त करून त्या पोलीस ठाण्यात आणल्या. महसूल पथकाच्या या कारवाईमुळे रिक्षामधून वाळू वाहतूक करणार्यांची चांगलीच धांदल उडाली. महसूल पथकाने पकडलेल्या सर्व रिक्षा चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
या रिक्षातून पुन्हा वाळूची वाहतूक केली जाऊ नये यासाठी या सर्व रिक्षा नष्ट केल्या जाणार आहेत. महसूल पथकाने या कारवाईमध्ये एका खबर्याचीही टू व्हीलर जप्त केली आहे. हा गाडी चालक महसूल अधिकार्यांच्या हालचाली बाबत इतर रिक्षा चालकांना खबर देत होता. त्याची वाळू भरलेली रिक्षा पकडण्यात आल्याने या खबर्याविरुद्ध काय कारवाई होणार याकडे संबंधितांचे लक्ष आहे.