दूधगंगा पतसंस्थेचे 5 वर्षांच्या कालावधीचे फेर लेखापरिक्षण सुरु

पतसंस्थेचे काही कर्मचारी व संचालक नॉट रिचेबल
दूधगंगा पतसंस्थेचे 5 वर्षांच्या कालावधीचे फेर लेखापरिक्षण सुरु

संगमनेर | शहर प्रतिनिधी

आर्थिक गैर व्यवहारावरून वादग्रस्त ठरलेल्या येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराची जिल्हा उपनिबंधक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या पतसंस्थेच्या मागील पाच वर्षांच्या कालावधीचे फेर लेखापरीक्षण करावे असे आदेश त्यांनी दिल्याने कालपासून तातडीने या पतसंस्थेचे फेर लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे.

1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील फेर लेखापरीक्षणानंतर गैरव्यवहाराचे सत्य बाहेर येणार असून हा गैर व्यवहार नेमका कोणी केला याची माहिती पुढे येणार आहे. यानंतर संबंधितावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

दूधगंगा पतसंस्थाही संगमनेर तालुक्यातील नावाजलेली पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना व शेतकर्‍यांना मोठा फायदा झालेला आहे. प्रगतीच्या घोडदौडीवर असलेल्या या पतसंस्थेबाबत गेल्या काही महिन्यांपासून उलट सुलट चर्चा सुरू होती. या पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची दबकी चर्चा सुरू असतानाच चार दिवसापूर्वी या पतसंस्थेला अचानक टाळे ठोकण्यात आले.

याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने ठेवीदारांनी आपापल्या ठेवी काढण्यासाठी पतसंस्थेसमोर मोठी गर्दी केली. यानंतर दुसर्‍या दिवशी पतसंस्था व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर फलक लावून पतसंस्था बंद ठेवण्याचे कारण सांगितले. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी पोलीस स्टेशन, जिल्हा उपनिबंधक व संगमनेर येथील सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दिला होता. पतसंस्थेच्या व्यवस्थापक व इतर कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले होते.

संगमनेर येथील सहकारी संस्था उपनिबंधक सर्जेराव कांदळकर यांनी या पत्राची दखल घेऊन त्वरीत जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल पाठवला होता. दूधगंगा पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हा असल्याने या पतसंस्थेवर जिल्हा उपनिबंधक यांचे नियंत्रण आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी त्वरीत दूधगंगा पतसंस्थेतील अपहाराची दखल घेतली. पतसंस्थेच्या फेर लेखापरीक्षणाचा त्यांनी तातडीने आदेश काढला. या आदेशानंतर पतसंस्थेचे फेर लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे.

फेर लेखा परीक्षणानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे. आर्थिक गैरव्यवहारामध्ये नेमका कोणाचा समावेश आहे याची माहिती समजणार आहे. फेर परीक्षणाला 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या अहवालानंतर आर्थिक गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. त्यानंतर संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. जिल्हा उपनिबंधकांनी फेर लेखा परीक्षणाचे आदेश दिल्याने पतसंस्था संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

काही महिन्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेमध्ये अपहार झाल्या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व व्यवस्थापकांना तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. अनेकांना तब्बल दहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. ही घटना ताजी असताना दूधगंगा पतसंस्थेत असा प्रकार घडल्यानेे तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

दूधगंगा पतसंस्थेमध्ये अनेक ठेवीदारांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. 25 लाखापर्यंत ठेेेवी ठेवणारे काही ठेवीदार आहेत. हे ठेवीदार दररोज पतसंस्थेसमोर चकरा मारताना दिसत आहे. संचालक मंडळाला शिव्यांची लाखोळी वाहताना ते दिसत आहे. पतसंस्थेचे काही कर्मचारी व संचालक नॉट रिचेबल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com