संगमनेर, राहुरी परिसरात पिकअप व भंगार चोरी करणारे 5 आरोपी जेरबंद

8 लाखाचा मुद्देमाल जप्त || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर, राहुरी परिसरात पिकअप व भंगार चोरी करणारे 5 आरोपी जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

संगमनेर येथून पिकअप व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथून भंगार चोरून नेत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पाच जणांना जेरबंद केले आहे. याबाबत माहीती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन, मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स.फौ.बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, रणजीत जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, अर्जुन बडे व अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत पथकास रवाना केले. पथक काल दि. 30 सप्टेंबर2023 रोजी नगर-मनमाड रोडने श्रीरामपूरकडे जात असताना, राहुरी फॅक्टरी येथून एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना दिसले. पथकास सदर पिकअपचा संशय आल्याने त्यांनी पो.नि. दिनेश आहेर यांना संशयीत वाहनाबाबत कळविले. त्यांनी तात्काळ पिकअपचा पाठलाग करुन संशयीतांकडे चौकशी करणे बाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे पथकाने संशयीत वाहनाचा पाठलाग करुन थांबविले असता केबिनमध्ये तीन व पाठीमागील ट्रॉलीचे हौदात दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे जैद मुश्ताक सय्यद (वय 19), उमर बशीर शेख (वय 21), दोन्ही रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, मुजम्मिल मन्सुर शेख (वय 22), रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, नजीर रज्जाक सय्यद (वय 24), रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी व सोहेल इब्राहिम पठाण (वय 19), रा. नांदुर रोड, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे नमुद पिकअप वाहनाचे कागदपत्र व त्यामधील भंगार सामान याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांना विश्वासात घेवुन अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर पिकअप संगमनेर येथून चोरुन आणला असून, वाहनातील भंगार सामान हे युनूस स्क्रॅप सेंटर, देवळाली प्रवरा ता. राहुरी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.

पथकाने आरोपींनी दिलेल्या कबुली नुसार जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मधील गु.र.न. 636/23 भा.दं.वि. 379, राहुरी पोलीस स्टेशन मधील गु.र.न. 1119/23 भा.द.वि. 379हे दाखल झालेले गुन्हे उघडकीस आले. आरोपीचे ताब्यातून राहुरी येथून चोरी केलेले 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 600 किलो वजनाचे पिवळे धातुचे भंगार सामान व संगमनेर येथुन चोरी केलेली 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची पिकअप असा एकुण 7 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवून राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

आरोपी जैद मुस्ताक सय्यद हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यात चोरीचे एकुण दोन गुन्हे दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com