संगमनेरच्या नर्सरी परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशिर वाळू उपसा

File Photo
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहरालगतच्या नर्सरी परिसरातील प्रवरा नदी पात्रातून दररोज रात्री खुलेआम बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. दररोज अनेक ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक सुरू असतानाही या परिसरात रात्रपाळीत काम करीत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे व महसूल कर्मचार्‍यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रात सध्या कुठलाही लिलाव सुरू नाही, असे असतांनाही बेकायदेशिररित्या वाळू उपसा सुरुच आहे. बेकायदेशिर वाळू उपशाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करून देखील महसूल व पोलीस प्रशासन गप्प आहे. वाळू तस्कर व महसूल खात्यातील काही कर्मचारी यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने हा वाळू उपसा सुरू असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पर्यावरणाचाही मोठा र्‍हास होत आहे.

शहरालगत असलेल्या नर्सरी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याने पुलाजवळ खड्डे पडले आहेत. शहरातील पाच वाळूतस्कर या भागातून वाळू उपसा करत आहेत. रात्रभर पाच ट्रॅक्टरमधून वाळूच्या अनेक ट्रिपा केल्या जात आहेत. या वाळूतस्करांची मुजोरी वाढलेली असल्याने ते कुणालाही दाद देत नाहीत. तक्रारी करणार्‍या ग्रामस्थांना दमदाटी करण्याचे काम करतात. या भागातील तलाठी व मंडलाधिकारी व रात्रपाळीच्या पोलीस कर्मचार्‍यांचे या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. वाळू उपशाबाबत रात्रपाळीच्या कर्मचार्‍यांकडे तक्रार करूनही या परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसाने वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केलेली नाही.

काही नागरिकांनी अनेकदा फोन करूनही या पोलीस कर्मचार्‍याने या फोनला दाद दिलेली नाही. सदरचा पोलीस कर्मचारी व वाळू तस्कर यांच्यात लागेबांधे असल्यानेच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचेही या कर्मचार्‍याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेस भरधाव वेगाने धावत असतात. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागला असे असतानाही पोलिसांचे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांकडे दुर्लक्ष होत आहे. या पोलीस कर्मचार्‍याबरोबरच या भागातील तलाठ्याचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने वाळू वाहतूक करणारांचे चांगलेच फावले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी संगमनेर येथील वाळू उपसाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वाळूतस्करांना साथ देणारा तो पोलीस कर्मचारी कोण ?

संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रातून दररोज रात्री खुलेआम बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात आहे. प्रवरा नदीवरील मोठ्या पुलाजवळ रात्री अनेक ट्रॅक्टर वाळू भरतात. या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्यावरून ये-जा करतात. याठिकाणी रात्रपाळीसाठी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हा पोलीस कर्मचारी कारवाई करण्याऐवजी वाळू तस्करांना सहकार्य करत असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकार्‍याचे मात्र या कर्मचार्‍यांच्या कारनाम्याकडे लक्ष नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी सोईस्कर कानाडोळा तर करत नाही ना? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com