संगमनेरच्या चार पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन

संगमनेरच्या चार पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरच्या कारागृहात एका कैद्याचा वाढदिवस जोरदार साजरा झाल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याची गंभीर दखल घेऊन संगमनेरच्या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या चार पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरातील कारागृहात काही दिवसांपूर्वी शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी मोठा केकही आणण्यात आला होता. याबाबत वृत्त दैनिक सार्वमत मध्ये प्रकाशित होताच या प्रकाराची उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी गंभीर दखल घेतली. संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने कारवाई करत चार पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.

यामध्ये संजय साबळे, रविंद्र कुलकर्णी (संगमनेर शहर पोलिस ठाणे), रामदास भांगरे (तालुका पोलीस ठाणे), आनंदा भांगरे (घारगाव पोलीस ठाणे) या चार जणांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश काल सकाळी संगमनेरच्या अधिकार्‍यांकडे पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली. संगमनेरच्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा सहज उपलब्ध होत असतो.

या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोरच कैद्यांना या वस्तू मिळतात. असे असतानाही संबंधित कर्मचार्‍यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले होते. एका कैद्याची मजल थेट वाढदिवस साजरा करण्यापर्यंत पोहोचली होती. याबाबत दैनिक सार्वमत मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रकाशित झाले होते, यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने चार कर्मचार्‍यांचे निलंबन केले.

कैद्यांना सुविधा सुरुच

संगमनेर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध सुविधा मिळत असल्याने हे कारागृह गेल्या काही महिन्यापासून चर्चेचा विषय बनले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी दखल घेऊन कानउघडणी केली होती. असे असतानाही या कारागृहातील कैद्यांना अद्यापही वेगवेगळ्या सुविधा मिळत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तुरुंग अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याने या कारागृहातील कैद्यांना तंबाखू, गुटका मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.