संगमनेर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी

संगमनेर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरातील चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या चोर्‍या होत असताना एका चोरट्याने चक्क संगमनेर शहर पोलीस ठाण्यातूनच रिक्षाची चोरी केल्याची घटना घडली. पोलिसांनी या रिक्षाचा तपास करून ती ताब्यात घेतली आणि रिक्षाची पुन्हा चोरी होऊ नये म्हणून तिला साखळदंडाने बांधून टाकले आहे.

संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यापासून चोरींच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मोबाईल, मोटरसायकल, सोन साखळ्या यांच्या चोर्‍या वाढल्या आहेत. शहर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे चोरट्याने फायदा घेतलेला आहे. शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात सातत्याने चोरी होत आहे.

एका चोरट्याने तर मोठी हिम्मत करून पोलीस ठाण्याच्या भिंतीजवळ उभी असलेली रिक्षा चोरून नेली. शहर पोलीस ठाण्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ राहणार्‍या संतोष नवले या रिक्षा चालकाची रिक्षा संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या भिंती लगत उभी करण्यात आलेली होती. ही रिक्षा काही दिवसापासून बंद अवस्थेत होती.

अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्री ही रिक्षा चोरून नेली. पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने त्या रिक्षाचा तपास सुरू केला. ही रिक्षा सापडून पोलीस ठाण्यात आणली. रिक्षाची पुन्हा चोरी होऊ नये यासाठी पोलिसांनी नवीन साखळी आणून ही रिक्षा पोलीस ठाण्याजवळ एका ठिकाणी बांधून टाकली. शहर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com