बदली झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे सुटेना

बदली झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे सुटेना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचार्‍यांची बदली होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या कर्मचार्‍यांनी अद्याप शहर पोलीस ठाणे सोडले नाही. संगमनेर शहर पोलीस ठाण्या अंतर्गत यातील एक कर्मचारी ‘खास’ कामगिरी करत असल्याने हा कर्मचारी बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचार्‍यांच्या दोन महिन्यापूर्वी अन्य पोलीस ठाण्यात बदल्या झालेल्या आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे सोडणे अपेक्षित असताना यातील एक कर्मचारी मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणे सोडत नाही. संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेल्या मारहाणीचे प्रकरण बदली झालेल्या पोलिसांच्या पथ्यावर पडले. हाणामारीचे निमित्त करून ते संगमनेर पोलीस ठाण्यातच थांबलेले आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काही दिवसांपूर्वी स्वीकारला आहे. शहराची अधिक माहिती नसल्याने त्यांना काही पोलीस कर्मचार्‍यांवर अवलंबून राहावे लागते. नेमका याचा गैरफायदा या कर्मचार्‍यांनी घेतलेला आहे. पोलीस अधिकार्‍यांना चुकीची माहिती हे कर्मचारी देत असल्याची चर्चा पोलिसांमध्ये होत आहे. शहर पोलीस ठाणे आपणच चालवत असल्याच्या अविर्भावात हे कर्मचारी असतात. यातील एका कर्मचार्‍याकडे खास वसुलीची जबाबदारी असल्याचेही बोलले जाते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्यांची रवानगी त्वरीत बदली झालेल्या पोलीस ठाण्यात करावी अशी मागणी शहरातून केली जात आहे.

डीवायएसपींनी कठोर भूमिका घ्यावी

संगमनेर येथे नव्याने पदभार स्वीकारलेले डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचार्‍यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे हे कत्तलखाने खुलेआम सुरू आहेत. डीवायएसपी वाघचौरे यांनी त्वरीत हे कत्तलखाने बंद करून त्यात सहभागी असणार्‍या पोलीस कर्मचार्‍या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com