
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यापासून महाविद्यालयीन युवकांबरोबरच अनेक तरुणांकडून आयोडेक्स, पेट्रोल, खोकल्याचे औषध, पेन्सिल, व्हाइटनर व विविध पावडरचा नशेसाठी वापर केला जात आहे. व्यसनांच्या या नवीन प्रकारांमुळे शहरातील पालक त्रस्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
संगमनेर शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तरुण एकत्र बसलेले दिसतात. या ठिकाणी त्यांचे भलतेच कारणामे चालू असतात. पूर्वी गर्द, अफू, चरस यासारखे पदार्थ वापरून नशेचा आनंद घेतला जायचा. आता यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची भर पडली आहे. गर्द नसला तरी गर्द सारखा एक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून शहरात धुमाकूळ घालत आहे. एका प्लॅस्टिकच्या कागदावर ठराविक रंगाची पावडर टाकली जाते. अतिशय महागड्या दराची पावडर संगमनेरात वेगवेगळ्या ठिकाणी सहज उपलब्ध होते.
या कागदावर ही पावडर मिक्स केली जाते. दहा रुपयांच्या नोटीचा वापर करून गर्द सारखी ही पावडर ओढली जाते. या पावडरमुळे अनेक युवक व्यसनाधीन बनत चालले आहे. या व्यसनामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक व्याधी, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. या पावडर सोबतच आयोडेक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ब्रेडला आयोडेक्स लावून ब्रेड खाल्ले जातात. यामुळे वेगळीच नशा येत असल्याचा युवकांचा अनुभव आहे. शहरातील वेगवेगळ्या औषधांच्या दुकानांमध्ये गेल्या काही महिन्यापासून आयोडेस्कची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
औषध विक्रेते कुठलेही चौकशी न करता या युवकांना हे औषध देतात. याशिवाय खोकल्याच्या औषधाचा ही मोठ्या प्रमाणात व्यसनासाठी वापर केला जात आहे. काही युवक व्यसनासाठी पेट्रोलचाही वापर करत असल्याचे दिसून येत आहे. छोट्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून या पेट्रोलचा सुगंध घेऊन काही युवक व्यसनाचा आनंद घेत आहे. संगमनेर शहरात व्यसनासाठी या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. भविष्यात याचे गंभीर परिणाम पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हाईटनर अथवा आयोडेक्स तसेच पेट्रोल आणि काही विशिष्ट खोकल्याची औषधे याने नशा येते. हे पदार्थ सहज आणि स्वस्त उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढते आहे. या पदार्थांचे सेवन हे मेंदू, हृदय, फुफ्फुसे, स्नायू यावर दुष्परिणाम करतात. वरील सर्व पदार्थ हे खाद्य पदार्थ या श्रेणीत मोडत नाहीत. या पदार्थांचे अशाप्रकारे सेवन करणे हे आरोग्याला घातक आहे.
- डॉ. संदीप कचेरीया वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी, ता. संगमनेर