नगरपरिषद हद्दीतील नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना मिळणार असेसमेंट उतारा 8 अ

संगमनेर नगरपरिषद
संगमनेर नगरपरिषद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपरिषद हद्दीतील नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना आता असेसमेंट उतारा 8 अ मिळणार आहे. शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. अखेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी त्यांची मागणी मान्य करत याबाबतचे लेखी पत्र दिले आहे.

शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी तसेच संजय गांधी नगर परिसरातील नागरिक यांच्या वतीने संगमनेर शहर नगरपरिषद हद्दीतील सर्वच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना हक्काचा मालमत्ता असेसमेंट उतारा 8 अ मिळावा व घरपट्टी, करपट्टी लागू करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत होती. अमर कतारी, दीपक कतारी, संजय तडसम, नामदेव फुलमाळी, मच्छिंद्र कतारी, वसीम अत्तार, शेटीराम पवार, भालचंद्र शिंदे, रमेश पवार, नारायण शिंदे, मधू पवार, सतीश शिंदे, विजय पवार व संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांनी याबाबत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे रितसर मागणी केली होती.

मागणी मान्य केली नाही तर नागरिकांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. संगमनेर नगरपरिषद व संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांचा संगमनेर न्यायालयासमोर एम ओ यु तडजोड नामा करारनामा झालेला आहे. सदर करारनाम्यात परिसरातील नागरिकांना आहे त्या ठिकाणी घरकुले बांधण्यात येतील, असा लेखी तडजोड नामा झालेला आहे. परंतु अनेक वर्ष झाले सदर घरकुल योजनेचे काम अद्यापही सुरू झालेले नाही घरकुल योजनेचे काम करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, निवेदन दिलेली आहेत.

आमदार बाळासाहेब थोरात तसेच नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनाही विनंती केली होती. त्यांनीही सदर घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. नगरपरिषदेचा मालमत्ता असेसमेंट उतारा असल्याशिवाय कोणतेही कर्ज व शासकीय लाभ घेता येत नाही हीच बाब परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना पटवून दिली. मुख्याधिकारी संगमनेर नगरपरिषद यांनी त्वरीत मागणी मान्य करत लेखी आश्वासन दिले. 2023 - 2024 या आर्थिक वर्षात संगमनेर नगरपरिषद हद्दीतील सर्वच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना, घर धारकांना, लाभार्थ्यांना मालमत्ता करार असेसमेंट उतारा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

संजय गांधी नगर, वडार वस्ती व इतर झोपडपट्टीधारक व नगरपरिषद हद्दीतील सर्वच झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून रहिवासींना नगरपरिषदेचा असेसमेंट उतारा 8 अ किंवा मालमत्ता नोंदणी दाखला मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर झोपडपट्टींना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार कर आकारणी करावी लागणार असल्याने सदर प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. तसेच नगरपरिषदेकडील उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे सदरचे काम करावे लागणार आहे. सदरचे काम येत्या आर्थिक वर्षात करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी लेखी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com