
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च पासून होत असलेल्या संपात संगमनेर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याचे निवेदन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे.
राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, संवर्ग अधिकारी, स्थानिक नगर परिषद कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करणेबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचनालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक होऊनही अद्याप पर्यंत नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग अधिकारी व कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसह जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबतची मागणी प्रलंबित आहे. वरील मागण्यासंदर्भात सर्व संघटना मार्फत वेळोवेळी निवेदन सादर करून विनंती करूनही शासनाने अद्याप पर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेल्या नाही. राज्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्य नगरपालिका महासंघ तयार करण्यात आलेला आहे.
कर्मचार्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय होत नसल्याने दिनांक 13 मार्च रोजी काळ्या फीत लावून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून 14 मार्च पासून संगमनेर नगर परिषदेच्या सफाई कामगार व अत्यावश्यक सेवांसह इतर सेवेतील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहे.
याबाबतचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, अभियंता पंकज मुंगसे, अश्विन पुंड, योगेश मुळे, सूर्यकांत गवळी, विशाल कोल्हे यांसह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सह्या असलेले निवेदन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे.