संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संगमनेर नगरपरिषद निवडणुकीतील प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2022 करिता शहराच्या प्रभागातील अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर, नियंत्रक तथा प्राधिकृत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी सहाय्यक कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुनील गोरडे, विशाल कोल्हे, उदय पाटील आदींचे सहकार्य लाभले.

संगमनेर नगर परिषदेच्या पंचवार्षिक कार्यकालाची मुदत संपल्यामुळे सन 2022 साठी सार्वत्रिक निवडणूक होत असून मा. सचिव, निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रान्वये तसेच जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या आदेशान्वये सदर आरक्षणाची सोडत करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना मंजूर केली असून त्यानुसार सदस्य आरक्षणाची सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरपरिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी द्विसदस्यीय 15 प्रभाग करण्यात आले असून 30 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणानुसार प्रभाग क्रमांक 2 व 13 हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यापैकी 2 अ ही जागा सोडतीने अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव झाली असून 13 अ ही जागा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

याव्यतिरिक्त उर्वरित प्रभागातील ‘अ’ ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून ‘ब’ जागा सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी, नियंत्रक तथा प्राधिकृत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी उपस्थितांना दिली. तसेच आरक्षणाची अधिसूचना रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणे करिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यावर अंतिम प्रसिद्धी ही 1 जुलै रोजी होणार तर 15 ते 21 जून या कालावधीत नागरीकांना यावर हरकती घेता येणार आहेत.

चिठ्ठी पद्धतीने झालेल्या आरक्षण सोडतीची चिठ्ठी संस्कार क्षीरसागर व कुमारी जरा बिलाल शेख या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. याप्रसंगी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com