संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक लांबल्याने इच्छुकांच्या हलचाली थंडावल्या

संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक लांबल्याने इच्छुकांच्या हलचाली थंडावल्या

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबल्याने या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या हालचाली थंडावल्या आहेत.

संगमनेर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपलेला आहे. डिसेंबरमध्ये मुदत संपल्याने कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून प्रशासनासह इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अपेक्षेप्रमाणे संगमनेर नगर परिषद परिषदेची प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली होती. राज्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने संगमनेर नगर परिषदेची प्रभाग रचना ही रद्द करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होईल याची कुठलीही शाश्वती नसल्याने आता सर्वांच्याच हालचाली थंडावल्या आहेत.

संगमनेर नगर परिषदेवर 1991 सालापासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी थोरात गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून डिसेंबर महिन्याच्या आतच शहरातील अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांचे डांबरीकरण व इतर कामे तातडीने मार्गी लावण्यात आले. सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम नगरपालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती आहे. ही नगरपालिका निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता असल्याने संगमनेरात सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी संगमनेरातील अनेक इच्छुक कामाला लागले होते. याशिवाय अनेक हौसे गवसे इच्छुक उमेदवार जोरदार कामाला लागलेले आहेत. गल्लोगल्ली मतदारांचे वाढदिवस साजरे करून त्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न या इच्छुकांकडून सुरू होते. याशिवाय अनेक मार्गांचा अवलंबही केला जात होता.

मात्र संगमनेर नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने व निवडणूक केव्हा जाहीर होईल याची कुठलीही शाश्वती नसल्याने इच्छुक उमेदवार अचानक थंडावले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत शांत राहण्याची भूमिका इच्छुक उमेदवारांनी घेतल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.