संगमनेर नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांची द्विधा अवस्था आणि धावपळ

संगमनेर नगरपरिषद
संगमनेर नगरपरिषद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी मतदानाची तारीख जाहीर केली असली तरी या तारखेला निवडणूक होणार का? अशी अनेकांना शंका आहे. यामुळे अनेक इच्छुकांची द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षा सह विरोधी भारतीय जनता पक्षानेही निवडणुकीसाठी कंबर कसल्याने यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची चिन्हे दिसत आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या मागील सदस्यांची मुदत डिसेंबर मध्येच संपलेली आहे. करोना महामारी, ओबीसी आरक्षण यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडलेली होती. मुदत संपल्याने संगमनेर नगरपरिषदेवर प्रशासकीय राज सुरू आहे. निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा कधी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अखेर निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

यामध्ये संगमनेर नगर परिषदेचा ही समावेश असल्याने निवडणूक कधी होणार याची उत्सुकता संपलेली आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी ही निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे कदाचित पुढे ढकली जाऊ शकते असा अंदाज अनेकांचा आहे. निवडणूक सहा महिने पुढे ढकलली तर काय करायचे असा विचार इच्छुक उमेदवार करत आहे. यामुळे त्यांची चल बीचल सुरू झाली आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी प्रारंभ केलेला आहे. संगमनेर नगरपरिषदेवर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे 1991 सालापासून वर्चस्व आहे. 31 वर्षांपासून असलेले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्ष जोरदार कामाला लागलेला आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. संगमनेर नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांना धूळ चारायची अशी तयारी संगमनेर भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे.

शहरातील सर्व प्रभागात उमेदवार उभे करून सत्ताधार्‍यांना शह द्यायचा अशी तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस पक्षाची आघाडी असल्याने संगमनेर येथील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगमनेर नगरपालिकेत काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षात सरळ लढत होण्याची चिन्हे आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीत एकूण 15 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून एक पुरुष व एक महिला असे दोन नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. 30 सदस्या मध्ये दोन जागा अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तीस जागांसाठी अनेक जण इच्छुक आहेत. सत्ताधारी पक्ष यंदा तरुण चेहर्‍यांना संधी देणार आहे.

याबाबत आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते यामुळे जुन्या नगरसेवकांचा पत्ता यावर्षी कट होण्याची शक्यता आहे. संगमनेर शहरात केलेल्या विकास कामांवर सत्ताधारी पक्ष भर देऊन मते मागणार आहेत. तर सत्ताधार्‍यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्ष निवडणूक प्रचार दरम्यान आवाज उठवणार आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com