
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेरातील जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 11 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरात विविध ठिकाणी कल्याण मटका जुगार चालतो अशी माहिती नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संगमनेरात सोमवारी येवून जय जवान चौक येथील केसेकर कॉम्प्लेक्स जवळील गाळा नंबर 3 शेजारी येथील मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी सुरेश भाऊराव अभंग (बटवालमळा, संगमनेर), गणेश निवृत्ती पाठक (देवाचा मळा), राकेश अशोक चिलबा (घुलेवाडी), यासीन उस्मान शेख (महात्मा फुले शाळेजवळ घुलेवाडी), संदीप दत्तु काकडे (साईनगर, घुलेवाडी), संपत गणाजी वैराळ (रा. इंदिरानगर, संगमनेर), जालिंदर देवराम सातपुते (रा. गणेशनगर), अशोक तुकाराम पावडे (रा. राजापूर), गणपत भिमाजी सातपुते (रा. सुकेवाडी), निवृत्ती रहादू वरपे (रा. गणेशनगर) हे कल्याण मटका जुगार खेळतांना मिळून आले. तर मटका धंद्याचा मालक शंकर दत्तात्रय इट्टप (रा. संगमनेर) हा फरार झाला आहे. पोलिसांनी 40 हजार 800 रुपये रोख व 14 हजार रुपयांचे 3 मोबाईल, 250 रुपये किमतीचे एक पेटीएम साऊंड बॉक्स व अंकसट्टा जुगाराचे साहित्य असा एकूण 55 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस प्रमोद सोनु मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 183/2022 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक उगले करत आहे.