
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहर व तालुक्यातील अनेक लॉजमध्ये काही महिन्यांपासून खुलेआम देहविक्री व्यवसाय सुरू असून पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
लॉजिंगच्या व्यवसायाला परवाना नसतानाही काहीजण बेकायदेशीरपणे लॉजिंगचा व्यवसाय करत असून हे लॉज कुंटणखाने बनले आहेत. संगमनेर शहर व तालुक्यामध्ये छुप्या पद्धतीने हा व्यवसाय चांगलाच भरभराटीस आला आहे. शहरातील किमान अर्ध्याहून अधिक लॉजमध्ये छुप्या पद्धतीने शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. शहरातील प्रमुख आणि गर्दीच्या ठिकाणावरील लॉजमध्ये हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
या लॉजमध्ये अनेक युवती, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व शेजारील तालुक्यातील महिला शरीर विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यासाठी लॉजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दर आकारला जातो. देहविक्री व्यवसाय करण्यासाठी एका तासाला पाचशे रुपयांपासून दीड हजार रुपयापर्यंत भाडे काही लॉजमध्ये आकारले जाते. या लॉजमध्ये गेल्या काही महिन्यांपासून शेजारच्या तालुक्यातील महिलांचा राबता मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.
लॉजमध्ये येणार्या महिला 1 ते 3 हजार रुपये आकारतात. याशिवाय लॉज चालकाचे भाडेही वेगळे घेतले जाते. शहरातील नवघर गल्ली, बसस्थानक परिसरात दररोज नवनवीन महिला फिरताना आढळतात. या महिला आपले सावज हेरून जवळच्या लॉजमध्ये प्रवेश करतात. शरीर विक्रीच्या व्यवसायामुळे लॉज चालक चांगले पैसे कमावत असून या लॉजचा नावलौकिक खराब होत असल्याने अनेकजण येथे थांबण्यास नकार देत आहेत.
शहरातील लॉज प्रमाणेच तालुक्यातील काही ठिकाणी रस्त्यावर असणार्या लॉजमध्येही शरीर विक्रीचा व्यवसाय खुलेआमपणे सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील एका लॉजवर पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत काही महिला व पुरुषांना पकडण्यात आले होते. शहरात, तालुक्यात खुलेआम शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू असताना पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील मान्यवरांच्या लॉजमध्ये असे प्रकार सुरू आहेत. या लॉज चालकांकडून एकजण दरमहिन्याला हप्ताही घेत असल्याची चर्चा आहे. महिन्याला पाच ते सहा हजार रुपयांचा हप्ता ही व्यक्ती घेत असल्याचे बोलले जाते. या व्यवसायामध्ये काही दलालही तयार झालेले आहेत. लॉजमध्ये व्यवस्थापक पदावर असणारा एकजण अनेकांना ग्राहक पुरविण्याचे काम करत आहे. या बदल्यात तोही चांगलाच गलेलठ्ठ बनला आहे. पोलिसांना याबाबत कल्पना असतानाही ते मात्र या बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करताना दिसत नाही. बाहेरील पोलीस येऊन कारवाई करत असताना शहर पोलीस मात्र या व्यवसायावर का कारवाई करत नाही? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
लॉज प्रमाणेच काहीजण आपल्या घराचा वापरही या व्यवसायासाठी करत असल्याची चर्चा आहे. पाचशे रुपये दर आकारून ते आपले घर या कामासाठी सहज उपलब्ध करून देत आहेत. पोलिसांनी अशा व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.