संगमनेरातील लॉजची पोलिसांकडून तपासणी

संगमनेरातील लॉजची पोलिसांकडून तपासणी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील काही लॉज मध्ये शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने काल शहर पोलिसांनी अचानक या लॉजची तपासणी केली. एकाही लॉजमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने तपासणीसाठी गेलेल्या पोलिसांना हात हलवत परत येण्याची वेळ आली. या लॉज मध्ये एकही महिला न आढळल्याने पोलिसांच्या या तपासणी बाबतच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

संगमनेर शहर व तालुक्यातील काही लॉज मध्ये खुलेआम शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी वडगावपान परिसरातील एका लॉजवर कारवाई केली होती. या कारवाईमध्ये काही महिला व पुरुष आढळले होते. शहरातील काही लॉज मध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे असे असतानाही पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

संगमनेर शहरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसाय बाबत माध्यमांनी वृत्त प्रकाशित केले होते. या बातम्यांची दखल घेऊन काल पोलिसांनी शहरातील काही लॉजची तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांना एकाही लॉजमध्ये शरीर विक्रीचा व्यवसाय करणार्‍या महिला आढळून आल्या नाही. दररोज सायंकाळी उशिरापर्यंत खुलेआम हा व्यवसाय सुरू असताना पोलिसांना मात्र एकाही लॉजमध्ये असा प्रकार आढळलेला नाही.

यामुळे पोलिसांच्या तपासणी बाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. शहरातील प्रमुख लॉजमध्ये हा व्यवसाय सुरू असताना व काही पोलिसांना याबाबतची चांगलीच कल्पना असताना पोलीस पथकाला काहीच आढळले नाही. लॉज चालकांशी संबंध ठेवणारा पोलीस कर्मचारी कोण? अशी चर्चा होतांना दिसत आहे. शहरातील एक युवकही या लॉजचा मलिदा गोळा करत असल्याची चर्चा शहरात होत आहे तो युवक कोण? याचा वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपास लावणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com