
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहरातील कुरण रोड, गुंजाळ नगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे वास्तव्यास असल्याने या परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चोरांची भीती असतानाच आता बिबट्यांचीही दहशत वाढू लागली आहे. या बिबट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जंगलामध्ये वास्तव्यास असलेले बिबटे अन्नाच्या शोधात नागरी वस्तीमध्ये दिसू लागले आहेत. शहरातील कुरण रोड व गुंजाळ नगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये दोन बिबट्यांचे वास्तव्य आहे. गुंजाळनगर परिसरातील उसाच्या शेताचा आश्रय घेतलेले हे बिबटे रात्री बारानंतर आपली शिकार करण्यासाठी बाहेर पडतात. या परिसरात राहणार्या अनेक नागरिकांनी त्यांना पाहिले आहेत.
रविवारी रात्री या परिसरात राहणार्या काही नागरिकांनी रस्त्यावरून जाणार्या दोन बिबट्यांना पाहिले. त्यांनी याची खबर इतरांना दिल्यानंतर याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. सुमारे तीन वर्षे वयाचे हे बिबटे उसाच्या शेतातून बाहेर येताना नागरिकांनी पाहिले. याठिकाणी गुंजाळनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष देविदास गांडोळे, दिगंबर गुंजाळ, अभिजीत घाडगे, जुबेर शेख, उबेद शेख त्वरीत पोहचले.
परिसरात राहणार्या नागरिकांनी आपली जनावरे व लहान मुले यांची काळजी घ्यावी, असे आवाहन या पदाधिकार्यांनी केले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर माळी यांच्याशी संपर्क साधून बिबट्या बाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरीत वन खात्याच्या काही कर्मचार्यांना पाठविले. या कर्मचार्यांनी अधिक माहिती घेऊन दोन दिवसाच्या आत बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.