संगमनेरात बेकायदा वाळू उपसा सुरू

राजकीय पदाधिकार्‍यांचा तस्करीत सहभाग
संगमनेरात बेकायदा वाळू उपसा सुरू
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. संगमनेर शहर व परिसरातून सध्या दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरमधून वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारीही वाळू तस्करीमध्ये सहभागी असल्याने महसूल कर्मचारी व अधिकार्‍यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे.

तालुक्यातील मुळा, प्रवरा व म्हाळुंगी या नदीमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात येतो. तालुक्यातील पठार भागातील मुळा नदीपात्राच्या गावांमधून वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जाते. संगमनेर शहर व परिसरातील गावांमधून प्रवरा नदी वाहते. संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, जोर्वे, मंगळापूर, खांडगाव या नदीपात्रातून गावांमधून वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. गेल्या काही महिन्यांपासून ही वाहतूक बंद होती. प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने वाळू वाहतूक करणे अवघड बनले होते. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्र कोरडे असल्याने वाळू वाहतूक करणार्‍यांचे चांगलेच फावले आहे. या वाळूतस्करांनी वेगवेगळ्या गावांमधून वाळू उपसा जोरात सुरू केला आहे.

कासारा दुमाला, खांडगाव या गावांमधून खुलेआम वाळू उपसा होत असतानाही तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वाळू तस्करीमध्ये सत्ताधारीसह विरोधी पक्षांच्या काही पदाधिकार्‍यांचाही सहभाग असल्याने व या पदाधिकार्‍यांची महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये उठबैस असल्याने कर्मचारी त्यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

शहरालगतच्या प्रवरा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. वेगवेगळ्या गावांमधून तब्बल 20 ते 25 ट्रॅक्टरमधून ही वाळू वाहतूक होत आहे. महसूल अधिकार्‍यांनी कारवाई करू नये, यासाठी वाळूतस्कर पूर्ण काळजी घेताना दिसत आहेत. वाळूतस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत.

तालुक्यात वाळूतस्करांची खास यंत्रणा सर्वपरिचित आहे. अधिकार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी या तस्करांनी काही युवकांची मानधनावर नियुक्ती केली आहे. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या युवकांना देण्यात आलेली असते. तहसीलदार कोठे जातात? याचा अंदाज हे युवक घेतात. तहसीलदार अथवा तहसील कार्यालयातील कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती मिळताच ते वाळू वाहतूक करणार्‍या चालकांना याची माहिती देतात. यामुळे अधिकारी पोहोचणे अगोदरच वाळूचे ट्रॅक्टर गायब झालेले असतात. तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू उपशात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. वाळूतस्करांबरोबरच काही पक्षांचे पदाधिकारी आता वाळूतस्कर बनले आहेत. यातील एकाचे दोन ट्रॅक्टर सध्या सुरू आहेत. पदाधिकारीच वाळू तस्कर बनल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com