संगमनेर : उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांसह पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार

देशी दारु दुकान प्रकरण भोवणार
संगमनेर  : उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांसह पाच 
कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार

संगमनेर (शहर प्रतिनिधी) - तालुक्यातील कासारा दुमाला येथील बेकायदेशीर देशी दारू दुकानाचे प्रकरण येथील राज्य उत्पादन शुल्कच्या एका अधिकार्‍यासह पाच कर्मचार्‍यांना भोवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कागदपत्रांची तपासणी न करताच संबंधित मालकाला परवाना दिल्याने अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे गेल्या दोन वर्षापासून बेकायदेशीर देशी दारू दुकान सुरू आहे. या दुकान मालकाने खोटे कागदपत्र सादर करून दारूच्या दुकानासाठी परवाना मिळवला होता. ज्या ठिकाणी दारूचे दुकान सुरू केले ती जागा गावठाण हद्दीत नसल्याने या जागेचा उतारा निघत नाही. ग्रामपंचायतीने एकही ना हरकत प्रमाणपत्र दिले नसतानाही या दुकानाला परवाना मिळाला कसा? या दुकानाबाबत अनेक तक्रारी झाल्याने ग्रामपंचायतीसह राज्य उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले आहे. ग्रामपंचायतीने या दुकानाला नोटीस देऊन दुकान बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान दुकान मालकाने भूमि अभिलेख कार्यालयाचे खोटा दाखला सादर करून परवाना मिळवला असल्याचे उघड झाले आहे. याबाबत तक्रारी होवूनही भुमिअभिलेख संगमनेर येथील अधिकार्‍यांनी या तक्रारीची दखल घेतलेली नाही. दुकान मालकाने सादर केलेल्या कागदपत्रांचीही त्यांनी तपासणी केली नाही. यामुळे काही नागरिकांनी याबाबतची तक्रार थेट भुमिअभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे केली आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा संबंधित अधिकार्‍यांनी दिला आहे.

संगमनेर येथील अधिकार्‍यांनी कागदपत्रांची तपासणी का केली नाही?, खोटा दाखला देऊनही त्याची चौकशी सुरु का केली नाही? याबाबत संबंधित अधिकार्‍याला वरिष्ठ कार्यालयाकडून विचारणा झाल्याचे समजते. हा दाखला बनवून देण्यात स्थानिक अधिकार्‍यांसह उत्पादन शुल्कच्या कार्यालयातील पाच कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. यामुळे या सर्वांवर खाते अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच बेकायदेशीर दारू दुकान चालकांमध्ये खळबळ उडालेली आहे. भुमिअभिलेख खात्यातील अधिकारी व दारू दुकानदार यांच्यात लागेबांधे असल्याची चर्चा असून यासंबंधी हे अधिकारी व कर्मचारी कुठल्याही कागदपत्रांची तपासणी न करता बोगस दाखले देत असल्याचे समोर आले आहे. भुमी अभिलेख खात्याने कोणताही दाखला दिला नसल्याचे पत्र दिल्याने ही बाब समोर आली आहे. आता स्थानिक अधिकारी संबंधित देशी दारू दुकानावर व या दुकान मालकावर कोणती कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com