संगमनेरातील बेकायदेशीर देशी दारू दुकान बंद पाडले

शिवसेना महिला आघाडीचा रुद्रावतार :शिवसेनेत मतभेद
संगमनेरातील बेकायदेशीर देशी दारू दुकान बंद पाडले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील दिल्ली नाका परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान शिवसेना महिला आघाडीने बंद केले शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कार्यकर्त्यांनी रुद्रावतार धारण करून शिवसेना स्टाईलने हे देशी दारू दुकान बंद केले. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत. शिवसेना पदाधिकार्‍यांनी एकमेकांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यामुळे हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी दारुचे दुकान अनेक वर्षांपासून सुरू होते. मध्यंतरीच्या काळात या दारुच्या दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर सुध्दा हे दुकान पुन्हा सुरु करण्यात आले होते. कोणताही नाहारकत दाखला नसतांनाही हे दारूचे दुकान खुलेआम सुरू होते. या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली यानंतर मुंबई येथील शिवसेनेच्या पदाधिकारी गव्हाणे या काल संगमनेर येथे आल्या. त्यांनी रुद्रावतार धारण करत हे दुकान बंद केले. दुकान पुन्हा सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना निवेदन देऊन या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली.

काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे. या देशी दारुच्या लायसनला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसताना लायसन सुरु कोणी ठेवले त्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी व सदरचे लायसन त्वरित बंद करावे. अशी मागणी करण्यात आली असून दुकान पुन्हा सुरु करु नये. सुरु झाल्यास राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अहमदनगर यांस दोषी ठरविण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान हे देशी दारूचे दुकान बंद केल्याने शिवसेना अंतर्गत मतभेद समोर आले आहे. मुंबई येथील पदाधिकार्‍यांनी दुकान बंद करण्याचे कारण काय असा सवाल शहरातील एका पदाधिकार्‍याने विचारला आहे. दुसर्‍या दारूच्या दुकानदाराकडून सुपारी घेऊन हे दुकान बंद पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गव्हाणे यांनी आरोपाचा खरपूस समाचार घेतला असून कोणाला किती हप्ते मिळतात याची माहिती आपल्याकडे आहे असे म्हटले आहे. एका पक्षाच्या व्हाट्सअप ग्रुप वर याबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com