रात्रभर चालू असणार्‍या संगमनेरातील हॉटेल काश्मिरवर पोलिसांची कारवाई

हॉटेल मालकाविरुध्द गुन्हा दाखल
रात्रभर चालू असणार्‍या संगमनेरातील हॉटेल काश्मिरवर पोलिसांची कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा विनापरवाना अधिक वेळ हॉटेल चालू ठेवताना आढळल्याने संगमनेर बस स्थानकासमोरील हॉटेल काश्मिरवर काल रात्री शहर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर बस स्थानकासमोरील हॉटेल काश्मिरी हे दररोज रात्रभर सुरू असते. संगमनेर बस स्थानकासमोर असल्याने या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत अनेक प्रवासी व शहरातील काही नागरिक नाश्ता करण्यासाठी व दूध पिण्यासाठी येत असतात. रात्री 10 नंतर हॉटेल व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. याप्रमाणे शहर पोलीस गावातील दुकाने बंद करतात. रात्री 10 नंतर शहरातील सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल काश्मिर मात्र, सर्रासपणे रात्रभर चालविले जाते. हॉटेल बंद असल्याचे भासवण्यासाठी हॉटेलचे बाहेरचे प्रवेशद्वार बंद ठेवले जायचे. दुसर्‍या बाजूने असणार्‍या दरवाजातून ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. रात्रीच्या बंदोबस्तास असलेले पोलीसही रात्री उशिरा या हॉटेलचा लाभ घेत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे याबाबत तक्रार गेल्यानंतर त्यांनी हॉटेलची पाहणी करण्याची सूचना पोलिसांना केली.

दि. 04 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर व पो. कॉ संतोष बाचकर हे पेट्रोलिंग ड्युटी करत असताना ठाणे अंमलदार भागा धिंदळे यांनी फोन करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वाघचौरे यांनी बस स्टॅड समोरील काश्मिर हॉटेल जवळ बोलाविले आहे, असे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचारी या हॉटेलजवळ गेले. हॉटेल मालक अकबर नजीम शेख (वय 43, रा. कुरणरोड गल्ली नं. 11, संगमनेर) यास सदर हॉटेल एवढ्या उशीरापर्यंत का चालविले. आपल्याकडे रात्री हॉटेल चालविण्याचा परवाना आहे का? असे विचारले असता, माझ्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली असता हॉटेलमध्ये दोन भारत गॅसच्या लाल रंगाच्या घरगुती वापराच्या टाक्या व दोन काळ्या रंगाच्या लोखंडी शेगड्या मिळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून गॅसच्या या टाक्याया जप्त केल्या.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भाऊसाहेब गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी हॉटेल मालक अकबर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com