
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
करोनाचा घाला, गारपीट, सततचा पाऊस, द्राक्षबागांमध्ये गुडघाभर साचलेले पाणी, रोगाचा प्रादुर्भाव आणि फवारणीवर फवारणी करण्याची वेळ अशा प्रतिकूल वातावरणात हिवरगाव पावसा (ता.संगमनेर) येथील शेतकर्याने हिंमत न हरता निर्यातक्षम द्राक्षाचे पीक घेतले आहे. यंदा पिकवलेली द्राक्षे थेट बांगलादेशात पोहचली असून, किलोला १२५ रुपयांचा भाव मिळत आहे.
हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल गडाख यांनी ही किमया साधली आहे. पूर्वी हिवरगाव पावसा हे गाव डाळिंबाचे आगार म्हणून ओळखले जायचे. मात्र याच डाळिंबबागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंबबागा काढून टाकल्या होत्या. आज येथील शेतकरी द्राक्षे पिकाकडे वळाले असून येथे सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्षांच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. अनिल गंगाधर गडाख या शेतकर्याने दोन एकर क्षेत्रात द्राक्षे केलेली आहेत. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी द्राक्षाचे पीक यशस्वी करून दाखवले आहे.
शुक्रवारपासून (ता.६) त्यांची द्राक्षे काढणी सुरू झाली असून द्राक्षे उत्तम दर्जाचे असल्याने हेच द्राक्षे थेट बांगलादेशात पोहचणार आहे. पहिल्याच दिवशी पाच ते सहा टन माल निघाला आहे. पावसाळ्यात याच द्राक्षे बागेतून गुडगाभर पाणी वाहत होते. मात्र तरीही गडाख यांनी न डगमगता द्राक्षबागेची चांगली काळजी घेतली. परिणामी आज निर्यातक्षम द्राक्ष घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. यावरुन नैसर्गिक संकटांमुळे चिंताग्रस्त असणार्या शेतकर्यांना त्यांच्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल.
वातावरणावर मात करत ही द्राक्षाची बाग आम्ही एक्सपोर्टसाठी पिकवली आहे. एकरी खता औषधांचा तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तसेच अनियमित वातावरणाचाही फटका बसला आहे. मात्र त्या पद्धतीने आम्ही काळजी घेतली. २०१८ पासून आत्तापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने द्राक्षे पिकवली असून तेव्हापासून ते आज पर्यंत भावही चांगला मिळाला आहे. नाशिक आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यभागी संगमनेर असून आमचा हा परिसर द्राक्षे पिकासाठी अतीशय चांगला आहे.
- अनिल गडाख (द्राक्ष उत्पादक - हिवरगाव पावसा)