
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहरामध्ये बेकादेशीर गुटखा विक्री करणार्या दोन दुकानांवर अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनाला बंदी असतानाही संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दुपारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार व अ. र. दाभाडे यांनी मोगलपुरा येथील मे. ताज ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. मुबीन खलील शेख (रा. एकतानगर, जोर्वे रोड) हा तेथे हजर होता. या पथकाने दुकानाचे अन्न परवान्याविषयी विचारणा केली असता परवाना घेतला नसल्याचे त्याने सांगितले.
दुकानामध्ये इतर अन्न पदार्थांसमवेत प्रतिबंधित असलेेला पदार्थाचा साठा आढळला. त्यामध्ये 2520 रुपये किमतीची हिरा पानमसालाची 21 पाकिटे, आरएमडी पानमसाल्याची प्रत्येकी 780 रुपयांचे कागदी बॉक्स (7803 रुपये), एम सॅटेड टोबॅको कागर्दी ब्राउनबॉक्स किंमत 360, आरएमडी पानमसाला प्रति बॉक्स 480 रुपयांचे दोन बॉक्स (एकूण 960 रुपये), एम सेंटेड टोबॅको 2 कागदी निळेबॉक्स प्रति बॉक्स 360 रुपयांचे एकुण किंमत 720 रुपये असा एकूण 5 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकाने गुटखा जप्त करून दुकान सील केले. प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा कोठुन खरेदी केला, या विषयी विचारणा केली असता अफ्रीदी पठाण (रा. रहमतनगर) या इसमाने दिला असल्याची माहिती मुबीन शेख याने दिली. तसेच सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ कोणास विक्री केली याबाबत माहिती विचारली असता त्याने फईम पठाण (रा. जोर्वे रोड, संगमनेर) यास विक्री केल्याचे सांगितले.
त्यानुसार या पथकाने मे. फईम किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स जोर्वे रोड, या पेढीमध्ये छापा टाकला. फईम बालम पठाण, रा. साईश्रदधा चौक, मालदाड रोड हा तेथे हजर होता. दुकानाची पाहणी केली असता विमल पानमसाला पाऊचेस (एकूण 270 रुपये) हिरा पान मसालाची 5 पाकिटे (किंमत 600 रुपये), रॉयल 717 सुगंधित तंबाखू प्रत्येकी 30 रुपये किमतीची 6 पाकीटे (180रुपये) असा एकूण 1050 रुपये किमतीच्या प्रतिबंधीत पदार्थांचा साठा जप्त केला. या दुकानालाही सील लावण्यात आले.
यानंतर अन्नसुरक्षा अधिकार्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 328, 188, 272, 188, 273, 34 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006, 26 (2) आदी कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.